शेवगाव – मराठा आरक्षणासंदर्भात सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू असताना आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या घटनेच्या निषेधार्थ काल (सोमवार) येथील व्यावसायिकांनी दिवसभर कडकडीत बंद पाळला.
सकल मराठा समाज सेवा संघातर्फे सकाळी छत्रपती शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घालून क्रांती चौक, आंबेडकर चौकमार्गे गाडगेबाबा चौकापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली.
या वेळी सकल हिंदू समाज, सकल राजभोई समाज मंडळ, माहेश्वरी समाज, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध पक्ष व संघटना यांनी निषेध रॅलीत सहभागी होऊन आपला पाठिंबा व्यक्त केला. रॅली अत्यंत शांततेत व शिस्तबद्धपणे पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराव्यतिरिक्त कोणतीही घोषणाबाजी झाली नाही.