जळगाव – अनिल देशमुख नवाब मलिक या नेत्यांना विनाकारण जेलमध्ये टाकण्यात आलं. भाजपने यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना तुरुंगात टाकलं. जालन्यात कारण नसताना सर्वसामान्यांवर लाठीचार्ज केला असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राज्यासह केंद्रातील भाजपवर देखील सडकून टीका केली. जळगाव येथे पार पडलेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपने केलेल्या यंत्रणांच्या वापराबाबत देखील सवाल उपस्थित केला.मोदींनी नऊ वर्षात केवळ फोडाफोडीचे राजकारण केले म्हणत पवारांनी थेट मोदींना यंत्रणांच्या वापराबाबत एक आवाहन केले. या सभेसाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जयंत पाटील,एकनाथ खडसे,अनिल देशमुख असे प्रमुख नेते उपस्थित होते. लोकांना दिलेली सत्ता लोकांच्या कल्याणासाठी वापरायला हवी पण आज भाजपने सत्तेचा गैरवापर केला आहे. भाजपने अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. माझं पंतप्रधान मोदींना एकच सांगणं आहे,जर कोणी चुकीचं काम केलं असेल तर त्याविरोधात तुम्ही खटला भरा, त्याची चौकशी करा आणि जर खोटं ठरलं तर त्याची सजा तुम्ही काय घेणार.. हे संपूर्ण देशाला सांगा असं पवार यावेळी म्हणाले. अनिल देशमुख यांचा दावा “शिवसेनेचे आमदार ते कशामुळे फुटले, त्यांना कशाचं आमिष दाखवलं, काय दिलं? 50 खोके एकदम ओके. 50 खोके घेऊन हे आमदार भाजप सरकारमध्ये सामील झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या लक्षात आलं की हे आमदार सामील झाले तरी आपल्याला जसा फायदा व्हायला पाहिजे तसा फायदा न होता, याउलट तोटा झाला, हे जेव्हा भाजपच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी दुसरा प्रयोग केला”, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.