sharad pawar : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या घटनेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. अशात शरद पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले,’सत्तेचा गैरवापर केला जातो, अशी तक्रार नेहमी होत असते. गोळीबार आणि तत्सम गोष्टी व्हायला लागल्या आणि राज्य सरकारने याबाबत बघ्याची भूमिका घेतली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, हे कळते. महाराष्ट्राच्यादृष्टीने अशा घटना चिंताजनक आहेत.’
दरम्यान यावेळी मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन शरद पवारांनी खोचक टीका केली. शरद पवार म्हणाले,’ लोकसभा निवडणुकीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत. ही चांगली बाब आहे, महाराष्ट्रातील लोकांसंबंधी त्यांची आस्था वाढत आहे, असे दिसते. माझी मागणी आहे की, गुजरातला ते गेल्यानंतर काहीतरी देण्याबाबतचे औदार्य दाखवतात, तसे त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर काहीतरी देण्याची घोषणा केली तर माझ्यासह राज्यालाही आनंद होईल’ असेही ते म्हणाले आहे.