Yogendra Upadhyay: उत्तर प्रदेशचे मंत्री योगेंद्र उपाध्याय (Yogendra Upadhyay) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काश्मीर खोऱ्यातील राजौरी येथे दहशतवाद्यांसोबत लढताना कॅप्टन शुभम गुप्ता यांना गुरुवारी वीरमरण आले. या घटनेनंतर त्यांच्या मतदारसंघातील नेते आणि उत्तर प्रदेशचेमंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी, राज्य सरकारच्यावतीने शुभमच्या आई-वडिलांना मदतनिधी म्हणून २५ लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्यावेळी आईला बळजबरीने धनादेश सुपूर्द केला आणि स्वत:चे फोटो काढले. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते आणि मंत्री महोदयांवर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली. त्यानंतर आता मंत्री उपाध्याय यांनी या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेला शुभम हा त्याच्या लहानपणापासून माझ्या परिचयाचा आहे. विशेष म्हणजे त्याचं शाळेतील अॅडमिशनही मीच केलं होतं. तो माझ्यासाठी घरातील सदस्याप्रमाणे होता. म्हणून, सैन्य दलात भरती झाल्यानंतरही आम्ही घरी गेट टू गेदर करुन आनंद साजरा केला होता. शुभमच्या आईंना चेक घेण्यासाठी बोलावले नव्हते. मात्र, घराबाहेर त्यांच्या मुलाचे शौर्य आणि बलिदान ऐकून त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होती. गेल्या तीन दिवसांपासून त्या घरातच होत्या. त्यामुळे, शुभमच्या वडिलांनीच त्यांना खोलीतून बाहेर येण्याचं सूचवलं होतं.
वसंत गुप्ता यांच्याकडे चेक दिला जात होता. त्यावेळी, त्या रडत होत्या. मात्र, मीडियावाल्यांनी फोटोचे फ्लॅश सुरू केल्यामुळे त्यांनी मीडियावाल्यांना उद्देशून तसे म्हटले होते. पण, एका काँग्रेस नेत्याने अपप्रचार करुन हा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर, तो त्याचप्रकारे व्हायरल झाला. आज शुभमच्या वडिलांनीही यावर स्पष्टीकरण दिलं आहे, असे मंत्री उपाध्याय यांनी म्हटलं. तसेच, शुभमच्या कुटुंबीयांस ५० लाख रुपयांची मदत, एक नोकरी देण्यात येईल. तसेच, गावातील एका रस्त्याला शुभमचे नावही दिल जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचंही उपाध्याय यांनी सांगितलं.
काय आहे व्हिडिओमध्ये?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या आई रडताना दिसत आहेत आणि उत्तरप्रदेशचे मंत्री योगेंद्र उपाध्याय व आणखी काही मंत्री त्यांना चेक स्विकारताना फोटो काढण्यासाठी हात धरताना दिसत आहे. मंत्री उपाध्याय यांनी चेक देताना फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्यासमोर त्यांची इच्छा नसताना पोज देण्यासाठी उभं केल्याचं दिसून येते.
असदुद्दीन ओवेसींची भाजपवर टीका
तेलंगणातील नऊ जागांवर विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एआयएमआयएम पक्षाच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसी आले होते, त्यावेळी त्यांनी,” भाजपचे मोठे नेते या ठिकाणी प्रचारासाठी येत आहेत. संरक्षण मंत्री (राजनाथ सिंह), पंतप्रधान (नरेंद्र मोदी) देशभक्ती दाखवत आहेत. दुसरीकडे, त्यांचे मंत्री जबरदस्तीने शहीद कॅप्टनच्या आईला धनादेश सुपूर्द करत आहेत. “आम्ही पंतप्रधानांना विचारतो की, तुम्ही एका शहीद कॅप्टनच्या आईच्या दु:खाला प्रसिद्धीचा मार्ग बनवला आहे. एका आईने देशासाठी आपला शूर मुलगा गमावला आहे. तुम्ही लोक तेलंगणात येऊन मोठमोठ्या गोष्टी बोलतात,” असे म्हणत ओवेसी यांनी याप्रकरणावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.