पुणे (प्रभात वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात राज्य सेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार महिला व बाल विकास विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा नागरिकांना अधिक सुलभतेने पुरविण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा अभ्यास गट नेमण्यात आला आहे.
महिला व बाल विकास आयुक्तालयाअंर्तगत दिल्या जाणाऱ्या सेवांसाठी अभ्यास गट स्थापन करण्यात येत आहे. यात महिला व बाल विकास आयुक्तालयाचे आयुक्त हे अध्यक्ष असतील, तर महिला व बाल विकास विभागाचे पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती. नागपूर. कोकण विभागीय उपायुक्त यांचा सदस्य म्हणून समितीत समावेश करण्यात आलेला आहे. महिला व बाल विकास आयुक्तालयाचे प्रशासन उपायुक्त यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.
अभ्यास गटाची कार्यकक्षाही ठरविण्यात आलेली आहे. डीजी लाॉकरशी सेवा संलग्न करण्यासाठी कार्यपद्धती विकसित करणे, अधिसूचित सेवाबाबत अभिलेख जतन करण्याबाबत कालावधी निश्चित करणे, सर्व सेवांचा आढावा घेऊन नवीन सेवांची अंमलबजावणी करण्याबाबत शिफारस करणे आदी कामे अभ्यास गटामार्फत करण्यात येणार आहे.
अभ्यास गटास आवश्यकतेनुसार बैठका घेता येतील. अभ्यास गटांनी आपल अहवाल चार महिन्यांत शासनास सादर करावा, असे आदेश राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचे अपर सचिव रा. ता. भालवणे यांनी जारी केले आहेत.