नवी दिल्ली – कुस्तीपटू विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार कर्तव्यपथावर ठेवले आणि ती तिथून निघून गेली. ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर आता जागतिक कीर्तीची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनेही पुरस्कार परत केले आहेत.
२२ डिसेंबर रोजी बजरंग पुनियानेही अशाच प्रकारे त्याचा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांच्या निवासास्थानाबाहेर ठेवला होता. त्याआधी बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले होते.
कुस्तीपटूंचे आंदोलन आणि आता पुरस्कार परत करण्यावरून देशभरातले विरोधी पक्ष केंद्र सरकारला धारेवर धरू लागले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या समर्थनात भाष्य करत भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून विनेशला पाठिंबा दर्शवला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, देशातल्या प्रत्येक लेकीसाठी तिचा आत्मसन्मान सर्वात महत्त्वाचा आहे.
एका घोषित बाहुबलीकडून सरकारला मिळणाऱ्या राजकीय फायद्याची किंमत या शूर मुलींच्या अश्रूंपेक्षा जास्त आहे का? पंतप्रधान हे देशाचे पालक असतात. त्यांची ही क्रूरता पाहून मन दुखावते.