– डॉ. मेघश्री दळवी
गेल्या वर्षी चॅटजीपीटीचं आगमन झाल्यापासून या एआय प्रणालीने बरेच बदल घडवून आणले आहेत. अशा प्रणाल्या आधीच्या डेटावरून शिकून नवीन काही निर्माण करू शकतात. मग त्यात लिखित स्वरूपातील मजकूर असेल, चित्रं असतील किंवा दृकश्राव्य निर्मिती असेल. आता या प्रणाल्यांमुळे ह्यूमनॉइडसच्या विकासाला मोठी चालना मिळते आहे.
ह्यूमनॉइड्स म्हणजे जवळपास माणसासारखे दिसणारे रोबॉट्स. हात, पाय, धड आणि डोकं अशी रचना असल्याने त्यांच्या हालचाली माणसासारख्या होतात. सेन्सर्स, कॅमेरे यांच्या मदतीने ते सभोवतालची माहिती मिळवतात आणि अर्थात माणसासारखं बोलू शकतात. त्यांचा वापर रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, बॅंका अशा ग्राहकसेवा व्यवसायात माणसांशी संवाद करण्यासाठी होतो. हॉस्पिटल आणि आरोग्यसेवांमध्येही मोठ्या प्रमाणात ह्यूमनॉइड्स येत आहेत. माणसांसारखं रूप असल्याने रुग्णांना त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्याकडून काम करून घेताना सोयीचं वाटतं.
त्याच वेळी डॉक्टर, परिचारिका आणि इतर स्टाफ यांच्यावरील कामाचा बोजा कमी होतो. त्यामुळे आरोग्यसेवेत ह्यूमनॉइड्स वेगाने रूळत आहेत. आज हे ह्यूमनॉइड्स आपलं बोलणं समजू शकतात. त्यांचा प्रतिसाद थोडा कृत्रिम असतो. मात्र, त्यांच्यात चॅटजीपीटीसारखी लार्जलॅंग्वेज मॉडेल प्रणाली वापरली तर त्यांचा प्रतिसाद नैसर्गिक पातळीवर नेता येईल. त्यांना अनेक भाषा शिकवून सहज, ओघवता संवाद साधता येईल. इंजिनिअर्ड आर्टस या कंपनीने लार्जलॅंग्वेज मॉडेलप्रणाली वापरून इंग्रजी, जपानी, जर्मन, चायनीज आणि फ्रेंच बोलणारे ह्यूमनॉइड्स तयार केले आहेत.
असे बहुभाषिक ह्यूमनॉइड्स आले तर हॉटेल्ससारख्या क्षेत्रात खूप फरक पडेल. आरोग्य क्षेत्रातदेखील रुग्ण आणि रोबॉट परिचारक यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण होईल. केवळ सेवा हा हेतू न ठेवता ते गप्पा मारू शकतील, सल्ले देऊ शकतील, आणि रुग्णाकडून काही शिकूदेखील शकतील. रुग्णाबरोबर संवाद करताना हे परिचारक बोलण्यासोबत दृकश्राव्य माध्यमांचा वापर करू शकतील. गरज पडल्यास खुणांची भाषा वापरतील. प्रत्येक वेळी काम करताना ते शिकत जातील, त्यातून त्यांची भाषा उंचावत जाईल. आरोग्यसेवेत ह्यूमनॉइड्सच्या कामाचं मूल्यमापन करणारं संशोधन झालं आहे. ते रुग्ण आणि आरोग्यसेवेतील तज्ज्ञ, दोघांनाही मदत करू शकतात आणि आपली क्षमता सतत सुधारू शकतात हे निश्चित झालं आहे.
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसोबत काम करताना ह्यूमनॉइड्स गंमतीदार प्रकारे चर्चा करत शिकवू शकतील. मनोरंजन क्षेत्रात ह्यूमनॉइड्सचा शिरकाव झाला आहे. थीम पार्क्स, मॉल, चित्रपट किंवा नाट्यगृह अशा ठिकाणी ह्यूमनॉइड्स ग्राहकांना मदत करतील, त्यांच्या अडचणी समजून सोडवतील आणि वेळ पडल्यास त्यांना तातडीची आरोग्यसेवा पुरवू शकतील. चॅटजीपीटी मागच्या ओपन एआय या कंपनीने इतर सहयोगी कंपन्यांबरोबर ह्यूमनॉइड्स बनवायला सुरुवात केली आहे. तेव्हा चटचट आणि अनेक भाषांमध्ये बोलणारे ह्यूमनॉइड्सचा जमाना आता लवकरच अवतरणार आहे.