डॉ. मेघश्री दळवी
आयर्नमॅन ही लहानमोठ्यांना अगदी सुपरिचित अशी व्यक्तिरेखा. आपल्या खास पोषाखातल्या जेटमधून धूर सोडत तो सरळ उंच उडतो तेव्हा सोबत अनेकांची स्वप्नंही भराऱ्या घेत असतात. अशाच एका स्वप्नातून आता एक नवा रोबॉट तयार झाला आहे.
रोबॉटिक्स या शास्त्रशाखेचा झपाट्याने विस्तार होतो आहे. तऱ्हेतऱ्हेच्या रोबॉट्सची जागतिक बाजारपेठ आता साठ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. वैद्यकीय क्षेत्रांपासून मनोरंजनापर्यंत सगळीकडे ही बाजारपेठ फोफावते आहे. त्यात अलीकडे एक विशेष उपयोग ठळकपणे उठून दिसतो. भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती असो किंवा आगीसारखं संकट असो, मदतकार्यात रोबॉट्सचा सहभाग वाढत चालला आहे. दुरून नियंत्रण करता येत असल्याने अशा वेळी रोबॉट्स वापरले तर मदतीसाठी जाणाऱ्या माणसांचा जीव धोक्यात घालायची गरज कमी होते.
फ्रान्सच्या नोत्रदामला लागलेल्या आगीच्या वेळी कलोसस या रोबॉटने वेगाने आग आटोक्यात आणली होती, हे उदाहरण तर आहेच. अनेकदा अतिशय अडचणीच्या जागी सापडलेल्या माणसांना मदत करणे जवळजवळ अशक्य होऊन राहतं, तिथेही रोबॉट्सना पाठवता येतं. सध्या मदतकार्यात दोन प्रकारच्या रोबॉट्सचा वापर होतो. एक म्हणजे दुर्गम भागात मदत पोहोचवताना ड्रोनसारखे हलके,
उडते रोबॉट्स. तर प्रत्यक्ष दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन काम करू शकणारे मजबूत चालते-फिरते रोबॉट्स. पण या दोघांचंही काम करू शकणारा एकच रोबॉट असेल तर? तो आयर्नमॅनसारखा उडत जाऊन संकटस्थळी पोहोचेल आणि तिथे प्रत्यक्ष मदतीचं कामही करू शकेल. या कल्पनेने प्रेरित होऊन इटालीतल्या एका संशोधन संस्थेने असा रोबॉट तयार केला आहे.
आयर्नकब असं फॅन्सी नाव असलेला हा रोबॉट साडेतीन फुटी उंचीचा आहे. म्हणूनच त्याला आयर्नमॅन न म्हणता आयर्नकब म्हणजे बच्चा म्हटलं आहे. तो जेट वापरून उडतो. त्याला हालचाल करू शकणारे माणसाच्या हातापायासारखे भाग आहेत. तो दोन पायांवर चालू शकतो. गरज पडली तर दोन हात आणि दोन पायांवरदेखील रांगत जाऊ शकतो. जड वस्तू किंवा माणसांना उचलून घेऊ शकतील असे त्याचे हात शक्तिशाली आहेत. गुंतागुंतीचे अल्गॉरिथ्म वापरून तो आपलं उड्डाण आणि हालचाल नियंत्रित करू शकतो.
कल्पना करा, एका उंच इमारतीत वरच्या मजल्यांवर कोणी अडकलं असेल, तर हा आयर्नकब उडत तिथे जाईल आणि त्या व्यक्तींना उचलून व्यवस्थित खाली घेऊन येईल. विशेषत: मुलं वा आजारी माणसं यांना खाली उतरवणं कठीण असतं. डोंगरदऱ्यांमध्ये अपघात झालेले गिर्यारोहक, भूकंपग्रस्त भागात अडकलेले नागरिक, त्सुनामी वा पुरात एकटे पडलेले प्राणी, अनेक ठिकाणी सुटकेसाठी असा रोबॉट वापरता येईल. या आयर्नकबवर पंधरा वर्षे काम सुरू होतं. त्यातून निर्माण झालेल्या या जबरदस्त रोबॉटचे काही व्हीडिओज ऑनलाइन पाहायला मिळतील.