– डॉ. मेघश्री दळवी
दिवाळीसारखे सण आले की फराळ, खरेदी, सजावट, भेटवस्तू यांच्यासोबत आणखी एक गोष्ट हक्काने येते, ती म्हणजे फोटो. त्यातही सेल्फीचं प्रस्थ जास्त. गंमत म्हणजे हे लोण अवकाशातही पोहोचलं आहे. क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावर खेचलेल्या सेल्फ्या खूप व्हायरल झालेल्या आठवत असतील. या रोव्हरच्या रोबोटिक हाताच्या टोकाला माहली म्हणजे मार्स हॅंडलेन्सइमेजर कॅमेरा बसवलेला आहे. मंगळावरची माती आणि खडकांचे फोटो घेणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. पण मजा म्हणून तोच कॅमेरा वापरून रोव्हर अधूनमधून सेल्फी घेतो. या माहली कॅमेऱ्यात एका वेळेस फक्त 33 अंश कोनातले फोटो टिपता येतात. त्यामुळे रोव्हर हा हात पूर्ण लांब करतो, वेगवेगळ्या कोनात फिरवतो आणि बरेच फोटो घेतो. नंतर हे फोटो एकत्र जोडून तयार होते क्युरिऑसिटीची सेल्फी.
सेल्फीचं तंत्रज्ञान नवं असं आपल्याला वाटत असलं तरी खूप पूर्वी अवकाशातून पहिला सेल्फी आपल्याला मिळालेला आहे. जेमिनी-12 मोहिमेतून बझअल्ड्रिन अवकाशात गेला होता. यानातून बाहेर पडून काम (ईव्हीए-एकस्ट्रा व्हेईक्युलर ऍक्टिविटी) करताना त्याने ईव्हीए कॅमेरा वापरून एक शानदार सेल्फी घेतली. त्यात त्याच्यासोबत त्याची उपकरणं आणि पार्श्वभूमीला निळीशार पृथ्वी दिसते आहे. अशा दिमाखदार पार्श्वभूमीची भुरळ कुणाला पडली नाही तर नवल! म्हणूनच 2010 मध्ये जपानच्या एका अवकाश मोहिमेत दोन वायरलेस कॅमेरे यानातून बाहेर सोडून यानाचा हॅंड्स फ्री सेल्फी घेतला होता.
आतापर्यंत बऱ्याच अवकाश सेल्फ्या झाल्याने टाइम मॅगझिनने चक्क त्यांची टॉपटेन यादी जाहीर केली आहे. अर्थात, दर वेळी सेल्फीची संधी मिळेलच असं नाही. यानाबाहेर पडणे, प्रकाश आणि पार्श्वभूमी यांचं गणित जुळवून आणणे, हे दर अवकाश मोहिमेत शक्य होत नाही. मात्र, मंगळावर रोव्हर पाठवून त्यांचे दुरून नियंत्रण करणे शक्य झाल्यावर अवकाशातील सेल्फी थोडी सोपी झाली. क्युरिऑसिटीच्या सेल्फीला म्हणूनच टॉपटेन यादीत बझअल्ड्रिन आणि स्टीव्हन रॉबिन्सनच्या सेल्फ्यांच्या खाली तिसरा क्रमांक मिळाला आहे.
आपल्या विक्रम आणि प्रज्ञान यांनाही हा सेल्फीचा मोह आवरलेला नाही. विक्रम लॅंडर 23 ऑगस्टला मंगळावर उतरल्यानंतर मग प्रज्ञान रोव्हर बाहेर निघाला. त्यावेळचा सेल्फी व्हिडिओ इस्रोने शेअर केला होता. विक्रम लॅंडरवरच्या कॅमेऱ्याने घेतलेल्या या सेल्फीत विक्रमचा उलगडलेला रॅम्प आणि त्यावरून उतरणारा प्रज्ञान स्पष्ट दिसतो. दूरवर गेल्यावर प्रज्ञानने विक्रमचा फोटो काढून पाठवला.
अलीकडे सूर्याच्या अभ्यासासाठी प्रस्थान केलेल्या आदित्य एल-1 यानाने देखील प्रवासात एक सेल्फी घेतली. तिच्यात आदित्यचे काही भाग दिसतात. या निमित्ताने आपल्याला ते जादुई रोमांचक क्षण इथे पृथ्वीवर बसून अनुभवता येतात ही खास बात!