– डॉ. मेघश्री दळवी
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ही आपली अवकाशातली आगळीवेगळी प्रयोगशाळा. अत्यल्प गुरुत्वाकर्षणात वेगवेगळे धातू, रसायनं आणि सजीव कसा प्रतिसाद देतात यावर तिथे संशोधन झालं आहे. तसंच अवकाशात काही गोष्टींचं उत्पादन घेणं शक्य आहे का, याचा अंदाज घेण्यासाठी तिथे सतत नवे प्रयोग सुरू असतात. अलीकडे यशस्वी झालेला तिथला एक प्रयोग म्हणजे गुडघ्याच्या सांध्यामधील कूर्चा थ्रीडीप्रिंट करणे.
पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे अतिशय नाजूक भागांचं उत्पादन करताना काही अडचणी येतात. असे भाग किंचित जरी ताणले गेले किंवा त्यांचा आकार जरा देखील बदलला तर ते कुचकामी ठरतात. अवकाशात मात्र शून्य किंवा अत्यल्प गुरुत्वाकर्षणामुळे हव्या त्या आकाराचे भाग खात्रीने घडवून घेता येतात. विशेषत: बायोप्रिंटिंग तंत्रज्ञानात जिवंत पेशी वापरून थ्रीडी प्रिंटिंग करताना गुरुत्वाकर्षण कमीत कमी असल्याचे फायदे दिसून आलेले आहेत.
रेडवायर या कंपनीतर्फे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात बायोफॅब्रिकेशन सुविधा उभारली आहे. त्यात माणसांना आणि प्राण्यांना उपयोगी होतील अशी वैशिष्ट्यपूर्ण जीववैद्यकीय (बायोमेडिकल) उत्पादने तयार करण्याची योजना आहे. गुडघ्यातली कूर्चा वयोमानानुसार झिजते. खेळाडू किंवा सैनिकांना कित्येकदा तरुण वयातच कूर्चा झिजण्याचा किंवा फाटण्याचा त्रास होतो.
अशा वेळी कृत्रिमरीत्या तयार केलेली कूर्चा बसवली तर त्या व्यक्तीचं दैनंदिन आयुष्य सुकर होतं. बायोप्रिंटिंग तंत्रज्ञानाचा त्यासाठी निश्चितच वापर करता येतो. गेली काही वर्षे कूर्चा बायोप्रिंट करण्याचे प्रयोग पृथ्वीवर सुरू आहेत आणि त्यांना मर्यादित यश मिळालेलं आहे. हेच प्रयोग अवकाशात यशस्वी करून पाहण्यासाठी रेडवायरने तयारी केली. त्यासाठी आपली अवकाश स्थानकावरची प्रयोगशाळा त्यांनी नवनवीन साधनांनी सुसज्ज केली. आणि यावर्षीच्या जुलै महिन्यात पहिली कूर्चा त्या प्रयोगशाळेत बायोप्रिंट केली.
मग ती 14 दिवसांसाठी कल्चर केली. त्यावर रेडवायरने आवश्यक त्या चाचण्या केल्या. नंतर सप्टेंबरमध्ये स्पेस एक्सक्रू 6 यान ही कूर्चा पृथ्वीवर परत घेऊन आलं. आता त्यावर इथल्या प्रयोगशाळांमध्ये रीतसर चाचण्या होतील. येत्या काळात बायोप्रिंटिंग तंत्रज्ञान अनेक ठिकाणी वापरात दिसणार आहे. गुडघ्यातल्या कूर्चेसारख्या गुंतागुंतीच्या रचनेच्या उती(टिश्यू) आपण अचूकपणे बायोप्रिंट करू शकलो तर ती या तंत्रज्ञानाची मोठी झेप म्हटली पाहिजे.
अनेक प्रकारच्या अवयवांसाठी असं कमी गुरुत्वाकर्षणातलं उत्पादन उपयुक्त होईल. त्यामुळे या प्रयोगाचं यश फार मोलाचं आहे. रेडवायरने पुढे हृदयाच्या उतींसाठी अवकाश स्थानकात बायोप्रिंटिंग करण्याचा प्रयोग आखला आहे. तसंच तिथे औषधनिर्मितीत बायोप्रिंटिंगचा वापर करण्याचा त्यांचा विचार आहे. अवकाश मोहिमांमध्ये थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाला प्रचंड महत्त्व येत चाललं आहे. अवकाशवीरांचे पोशाख ते यानातले स्पेअरपार्टस हवे तसे थ्रीडीप्रिंट करून घेता येतात. त्यात आता जीववैद्यकीय भाग बायोप्रिंट करून घेण्याची भर पडत आहे.