पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात मंगळवारी (दि.१९) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्यासमोर सावरकर यांचे अभ्यासक चंद्रशेखर साने आणि सावरकर यांच्या विचारांचा आधार घेऊन सामाजिक कार्य करणारे राहुल बनकोंडे यांची साक्ष झाली. या दाव्याची पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर भाषण केले होते. त्यात त्यांनी डोकलाम आणि सावरकरांचा संदर्भ दिला होता. ते म्हणाले होते की, सावरकर आणि त्यांचे पाच सहा मित्र एका मुस्लिम व्यक्तीला मारत होते. तेव्हा सावरकरांना आनंद होत होता. असं त्यांनी पुस्तकात लिहिले आहे. तसेच डोकलाम चा उल्लेख करीत समोरची पार्टी कमजोर असेल तर तिला मारावे आणि जर आपण कमजोर असू तर पळून जावे, असे विधान गांधी यांनी केले होते.
या वादग्रस्त विधानाप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात २५ नोव्हेंबर रोजी सात्यकी सावरकर यांची साक्ष नोंदविण्यात आली होती. त्यावेळी त्यांना न्यायालयात काही साक्षीदार उपस्थित करण्यास सांगितले होते. त्यानुसार सात्यकी सावरकरांकडून चंद्रशेखर साने व राहुल बनकोंडे असे दोन साक्षीदार न्यायालयात हजर करण्यात आले. सात्यकी सावरकर यांच्या वतीने अॅड संग्राम कोल्हटकर यांनी काम पाहिले.