सातारा – शहरातील मोळाचा ओढा, सैदापूर परिसरात विविध गुन्हे करणाऱ्या अर्जुन दौलत पवार याला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी सुधाकर भोसले यांनी पारीत केला आहे. याबाबत माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार अर्जुन पवार याच्यावर दरोडा, जबरी चोरी, मारामारी असे गंभीर गुन्हे शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
या गुन्ह्यांमध्ये अटक आणि जामीन झाल्यानंतर अर्जुनवर अनेक वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याने, त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अन्वये अर्जुन पवारला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांमार्फत सादर केला होता.
या प्रस्तावाची चौकशी पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी केली होती. या प्रस्तावावर सुधाकर भोसले यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यानंतर अर्जुन पवारला दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश भोसले यांनी पारित केला आहे. या सुनावणीत अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, हवालदार सचिन माने, स्वप्निल पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल कुंभार, अमित सपकाळ यांनी पुरावे सादर केले होते.