कराड – कराड येथे बुधवार, दि. 17 पासून सुरू होणार्या आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवात देशातील सर्वांत उंच आणि देखणा ‘सोन्या’ बैल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या महोत्सवात सोन्या बैलासह दोन टनाचा रेडा, देशातील सर्वांत लहान अडीच फूट उंचीची ‘पुंगनूर’ गाय लक्षवेधी ठरणार आहेत.
शेतकर्यांना उपयुक्त असलेली माहिती आणि शेतीचे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध व्हावे, यासाठी कृष्णाकाठचे भाग्यविधाते, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्यावतीने आणि कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा बँकेच्या सहकार्याने कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर दि. 17 ते दि. 21 या दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि भाजपचे सातारा लोकसभा मतदारसंघ प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या संकल्पनेतून कराडमध्ये प्रथमच होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवात जातिवंत जनावरांसह वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे व शेतीविषयक उपकरणांचे आकर्षण राहणार आहे. या महोत्सवात देशातील सर्वांत उंच ‘सोन्या’ बैल आकर्षण ठरणार आहे. या बैलाची किंमत 41 लाख रुपयांहून अधिक असून, तो पाहण्यासाठी गर्दी होणार आहे.
हा बैल शांत स्वभावाचा असून, त्याची देखभाल करताना फारसा त्रास होत नाही. त्याचा खुराक मात्र पैलवानापेक्षाही जास्त आहे. या बैलाची उंची साडेसहा फूट आणि लांबी साडेआठ फूट आहे. त्याला दिवसांतून दोन लिटर दूध, सात ते आठ अंडी, 200 मिली करडई तेल, सहा प्रकारचे खाद्य आणि दोन वेळा वैरण दिली जाते.
हा बैल हाताळण्यासाठी एक माणूस पुरेसा ठरतो. या बैलापासून ‘ब्रीड’ तयार केले जात असून, तेदेखील उंच आणि देखणे तयार होते. या बैलापासून झालेल्या वासराची किंमत सुमारे सव्वा लाख रुपये आहे. या महोत्सवात ‘सोन्या’ बैलासह भारतातील सर्वांत लहान पुंगनूर जातीची अडीच फूट उंचीची गायही शेतकर्यांना पाहायला मिळणार आहे.
त्याचबरोबर दोन टन वजनाचा रेडा, एक फूट लांबीची मिरची, दीड फुटाची लोंबी, इलेक्ट्रिक बैल हीदेखील खास आकर्षणे ठरणार आहेत. या प्रदर्शनात 11 देशातील कंपन्यांचे मान्यवर सहभागी होणार आहेत. 36 देशांमधील पिकांचे नमुनेदेखील पाहायला मिळणार असून, कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव शेतकरी आणि नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.