तळमावले – येथील प्राना फाऊंडेशन व गांधी फाऊंडेशन कराड यांच्यावतीने आणि कृष्णा रुग्णालय, एच. व्ही. देसाई आय सेंटर कराड, ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र सणबूर-सळवे यांच्या विशेष सहकार्याने मंगळवार, दि. 17 रोजी ढेबेवाडी येथे, तर गुरुवार, दि. 19 रोजी तळमावले येथे मोफत आरोग्य महामेळावा आयोजित केल्याची माहिती प्राना फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ.सौ. प्राची नरेंद्र पाटील यांनी दिली.
डॉ.सौ. पाटील म्हणाल्या, समाजकार्याचा वारसा घेवून प्राना फाऊंडेशन गेल्या काही वर्षांपासून महिला सबलीकरण, शैक्षणिक, सामाजिक विकास, पर्यावरण रक्षण व आरोग्य यासाठी महत्वपूर्ण योगदान देत आहे. सामाजिक विकासाचे मूळ चांगल्या आरोग्यात असल्याने त्यावर फाउंडेशनने विशेष लक्ष केंद्रीत केलेले आहे. नवरात्रोत्सवात “महिमा देवीचा, जागर आरोग्याचा’ अंतर्गत आयोजित मोफत आरोग्य महामेळावा हा त्याचाच एक भाग आहे. प्राना फाऊंडेशन व गांधी फाऊंडेशन यांच्यावतीने ढेबेवाडीत फाऊंडेशनच्या कार्यालयात सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत आणि गुरुवारी तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात आरोग्य महामेळावा होईल.
यामध्ये मोफत नेत्र तपासणी होवून प्रथम पाचशे शिबिरार्थिना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. स्त्री सर्वरोग निदान शिबिराचेही आयोजन आहे. त्यात सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
मनोसोपचार, जनरल मेडीसीन, शस्त्रक्रिया, बालरोग, नाक-कान-घसा, दंतरोग, स्त्रीरोग आदींचे तज्ञ उपस्थित राहून तपासणी व उपचार करणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ.सौ. प्राची पाटील यांनी केले आहे.