मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांची माहिती; दि. 21 ते 24 डिसेंबरदरम्यान होणार आयोजन
सातारा – सातारा, उद्योजकता विकास व सातारा जिल्ह्यामध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) तर्फे राष्ट्रीय स्तरावरील “मास औद्योगिक प्रदर्शन 2023′ आयोजित केले आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर हे चार दिवसीय प्रदर्शन दि. 21, 22, 23 व 24 डिसेंबर 2023 रोजी होणार असल्याची माहिती “मास’चे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, मासचे उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, चेअरमन धैर्यशील भोसले, हिंदुस्तान फिड्सचे नितीन माने, कवित्सु ट्रान्समिशनचे वसंत फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते. मोहिते पुढे म्हणाले, या प्रदर्शनाचे उद्घाटन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दि. 21 डिसेंबर रोजी होणार आहे. कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाचे अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) आयोजित व कुपर कॉर्पोरेशन प्रा. लि., मुख्य प्रायोजक व सहप्रायोजक म्हणून हिंदुस्थान फिडस मॅन्यु. कंपनी, टॉप गिअर ट्रान्समिशन प्रा.लि. व कवित्सू ट्रान्समिशन प्रा. लि. यांच्या सहकार्याने भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश हा सातारा जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना त्यांची उत्पादने व सेवा प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देणे आहे. सातारा येथे साधारणतः लहान- मोठे उद्योग असून ते अनेक इंडस्ट्रीजला लागणाऱ्या अवजड यंत्रसामुग्रीपर्यंतच्या विविध वस्तू निर्माण करतात. येथे फौंड्री, गिअर बॉक्सेस, ऑटोमोबाईल पार्टस, रबर, प्लास्टिक, औषध निर्माण, प्रेसशॉप्स, वैद्यकीय यंत्रसामुग्री, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी अवजारे आदीचे उत्पादक आहेत.
नवीन औद्योगिक धोरणामुळे सातारा जिल्ह्यात, शिरवळ, खंडाळा, लोणंद व फलटण येथे अनेक बहुराष्ट्रीय उद्योग उभारण्यात आले आहेत. या उद्योगांना तसेच पुणे, कोल्हापूर, चिपळूण, गोवा, बेळगाव जिल्ह्यातील प्रस्थापित उद्योगांना अनेक प्रकारची यंत्रसामुग्री, मशिनरी, स्पेअर्स पार्टस व इतर सेवा कायमस्वरूपी लागत असतात. सातारा येथील उद्योजकांना ही मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनाद्वारे सातारा येथील उद्योगांची उत्पादने व उत्पादन क्षमता याची माहिती नवीन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना करून देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. थोडक्यात म्हणजे मेक इन सातारा हा ब्रॅंड प्रमोट करणे व साताऱ्याच्या उद्योगवाढीला गती देणे, यासाठी मासने या प्रदर्शनाद्वारे एक मोठे पाऊल उचलले आहे.