वाई – वाई शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर सहकारी मित्रमंडळीनी एकत्र येत वाई शहर व तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांना आवश्यक व गरजेच्या आरोग्य सेवा पुरवण्याच्या हेतूने कोविड टास्क फोर्सची निर्मिती करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
तालुक्याबरोबरच वाई शहरात करोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरात दररोज करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वाई शहरातील करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी व करोनाग्रस्त रुग्णांच्या कुटुंबीय व नातेवाइकांना येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी टास्क फोर्सच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे.
यामध्ये गरजू करोनाग्रस्त रुग्णांना मोफत भोजन व्यवस्था, घरामध्ये विलगीकरण झालेल्या गरजू रुग्णांना मोफत औषधे व तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन, त्यांच्या प्रकृतीची दैनंदिन नोंद, वाई शहर, तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमधील बेडची दैनंदिन माहिती रुग्ण व नातेवाइकांना पुरवणे, करोना आजारासंबंधी घ्यावयाची काळजी याबाबत पत्रके व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती, प्रशासन, आरोग्य विभाग करोना रुग्ण व नातेवाइक यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका, वाई शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटनाकडे असणाऱ्या ऑक्सिजन मशीन उपलब्धतेविषयी माहिती सांगणे.
कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना लागणाऱ्या कागदपत्रे व अडचणीसाठी मदत करणे, करोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान लवकर बरे होण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तिंमार्फत मोफत आहार व व्यायामाचे योग्य मार्गदर्शन, करोना काळात सतर्कता, जबाबदारीची जाणीव करून सकारात्मक ऊर्जा निर्मिती करणे याचबरोबर कोविड लसीकरण मोहिमेस सहकार्य करून जनजागृतीचे काम करणारी कोविड टास्क फोर्स कोविड रुग्ण व नातेवाइकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे.
कोविड टास्क फोर्सच्या शुभारंभप्रसंगी वाईचे प्रांताधिकारी, तहसीलदार, उद्योजक अनिल सावंत, भारतदादा खामकर, विजय ढेकाणे, प्रदीप जायगुडे, राजेश गुरव, नितीन कदम, काशिनाथ शेलार, गणेश जाधव, अशोक मलटने, सोहनी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.