सातारा – अंगणवाडी संप कलावधीत लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये यासाठी आहार पुरवठ्याची, अंगणवाडी केंद्र संचालनाची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबेल अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आहे. संप काळात कोणीही लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत त्यांनी सुचना केल्या आहेत.
दि. ४ डिसेंबर २०२३ पासून अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारल्याने अंगणवाडी केंद्र बंद आहेत. परिणामी आहार वाटप बंद असल्याने लाभार्थी आहारापासून व पूर्व शालेय शिक्षणापासून वंचित राहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडीतील लाभार्थ्यांना वर्षातून किमान ३०० दिवस आहार पुरवठा करणे बंधनकारक केलेले आहे. या संदर्भात आयुक्तालया मार्फत अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत देखील लाभार्थी आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी आहार वाटपाची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याशी व्हीसी द्वारे संवाद साधण्यात आला असून त्यानुसार जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांनी अंगणवाडी सुरू करण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी सुचना करण्यात आल्या आहेत.
अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी त्यांच्या बीटमधील सर्व अंगणवाडी केंद्रांतील पात्र ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना संप कालावधीत आहार पुरवठा पर्यायी व्यवस्थेमार्फत उपलब्ध होण्यासाठी सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करावा. अंगणवाडीतील संपूर्ण साहित्य मोजून घेवून आहारामधील सर्व वस्तूंचे मोजमाप करुन सर्व साहित्य ताब्यात घेऊन पंचनामा करावा.संबंधित ग्रामपंचायतीच्या सहाय्याने अंगणवाडी सेविकांकडून पंचनामा करुन अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी तात्काळ चाव्या ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी. नागरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी स्थानिक नगरसेवक,स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या समक्ष पंचनामे करुन तात्काळ चाव्या ताब्यात घ्याव्यात.चावी देण्यास टाळाटाळ करीत असल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशा सुचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये यासाठी अंगणवाडी केंद्र क्षेत्रातील लाभार्थ्यांचे पालक, महिला मंडळ, महिला बचत गट, आशा वर्कर तसेच सामाजिक संस्था यांच्यापैकी उपलब्ध असलेल्या पर्यायाची योग्य निवड पर्यवेक्षिकांनी गाव पातळीवर, वार्ड स्तरावर करावी. प्राथमिक शाळेच्या आवरातील अंगणवाडी केंद्रांतील लाभार्थ्यांना शाळेतील मुलांना आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकीकडून आहार शिजवून घेण्यात यावा. त्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी लाभार्थी प्रमाणानुसार कच्चा आहार अंगणवाडी केंद्रांतून उपलब्ध करुन दयावा. आहार शिजवून ग्रामपंचायत, वार्डमधील नगरपालिका प्रतिनिधींच्या नियंत्रणाखाली आहाराचे वाटप करावे.
आहार शिजवून व वाटप करणाऱ्या व्यक्तींना शासनाने ठरवून दिलेल्या दराने (प्रति लाभार्थी प्रति दिन 65 पैसे) अदा करण्यात यावेत. अंगणवाडी केंद्रांतील आहार शिजवणे व आहाराचे वाटप हे ग्रामपंचायतमधील शिपाई, डाटा इंन्ट्री ऑपरेटर किंवा इतर प्रतिनिधी नागरी भागात नगरपालिकेचे प्रतिनिधी यांच्या समक्ष व निगराणीखाली करण्यात यावे. या संदर्भात अंगणवाडी केंद्रांबाबतची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील. तसेच नागरी भागात संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील, असेही आयुक्तांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.