सासवड – केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाव्दारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021, सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांमध्ये सासवड नगरपरिषदेने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. शनिवारी (दि. 20) विज्ञान भवन नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद व केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सासवडकर नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी निखिल मोरे आणि आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी प्रधान सचिव श्री पाठक, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तेमान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग बागेल, नगरसेवक अजित जगताप, सुहास लांडगे, मनोहर जगताप उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानातंर्गत सासवड नगरपरिषदने घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा संकलित करून त्याचे सेंद्रिय खत निर्मितीचा उपक्रम राबविला आहे.
प्लॅस्टिक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करताना नागरीकांना अल्प दरात पुनर्वापरायोग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देत आहे. नागरीकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सासवड नगरपरिषदेने विविध मोहिमा राबविल्या असल्याने कचरामुक्त शहर व सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सासवड नगरपरिषद यापुर्वी सलग चार वर्षे केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात अव्वल ठरली आहे.