वाघोली (प्रतिनिधी)- लोहगाव येथील राष्ट्रीय कुस्ती पंच सचिन खांदवे यांची कन्या समृद्धी खांदवे हिने 2/23 बॅच एसएसआर प्रशिक्षणार्थी नौदलामध्ये बेसिक प्रशिक्षण पूर्ण केले व प्रशिक्षणामध्ये सर्वोत्कृष्ट महिला अग्निवीर पुरस्कार प्राप्त केला.
भारतातून 2632 नौसैनिक भरती झाले होते. त्यामधून समृद्धीने द्वितीय क्रमांक पटकावला व 396 महिला प्रशिक्षणार्थी नौसैनिकांमधून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल वाघोली, लोहगाव, खराडी परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आयएनआर चिलका ओरिसा या ठिकाणी नेत्रदीपक पासिंग आऊट परेड संपन्न झाली.
भारताचे नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार यांच्या हस्ते सुवर्णपदक व जनरल बिपिन रावत ट्रॉफी समृद्धी खांदवे हिला देण्यात आली. मुलांमधून सर्वोत्कृष्ट एसएसआर नौदल प्रशिक्षणार्थी पुण्याचाच शिरूर येथील प्रथमेश दरेकर ठरला. त्यांना सुवर्णपदक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लष्करातील अनेक अधिकारी उपस्थित होते.
समृद्धी खांदवे हिने नेत्रदीपक कामगिरी करून मुलींपुढे आदर्श उभा केला आहे. नौदल, हवाई दल, यात प्रवेश करणार्या मुलींसाठी समृद्धी प्रेरणादायी ठरली आहे. याचा वाघोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांना सार्थ अभिमान आहे. -संदीप सातव, जिल्हाध्यक्ष भाजयुमो