शिर्डी – आशिया खंडातील सर्वांत मोठे मेगा किचन म्हणून ओळख असलेल्या साई संस्थानच्या प्रसादालयातील जेवणाची भुरळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पडली असून, त्यांनी थेट जेवण बनविणाऱ्या दोन्ही कुकला थेट राष्ट्रपती भवनात जेवण बनविण्यासाठी बोलविले आहे.
मागील महिन्यात राष्ट्रपती साई समाधी दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी साई मंदिरात पाद्यपूजा करून बाबांविषयी सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर थेट जेवणासाठी साईप्रसादालयात गेल्या.
त्याठिकाणी त्यांच्यासाठी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या काही भाज्या, भाकरी आदी पदार्थ बनविण्यात आले होते. त्या जेवणाचा स्वाद घेताना त्यांना त्या स्वादाची इतकी भुरळ पडली की, त्यांनी थेट जेवण बनविणाऱ्या आचाऱ्यांना दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात जेवण बनविण्यासाठी बोलवण धाडले असून, अशा आशयाचे त्यांनी पत्र साई संस्थानला पाठवले आहे.
त्याची तत्काळ दखल घेऊन प्रशासनाने प्रसाद कर्डिले व रवींद्र वहाडणे या दोन्ही कुकला दिल्ली येथे पाठविण्याची परवानगी दिली आहे. साई संस्थानच्या दृष्टीने व शिर्डीच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण घटना मानली जात असून, शिर्डी व परिसरात कर्डिले व वहाडणे या दोन्ही आचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असून, संस्थानच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.