बारामती महिला शासकीय रुग्णालयाची गुड न्यूज : आई व बाळाची प्रकृती ठणठणीत
बारामती – करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सर्वत्र चिंतेचे मळभ दाटले असताना बारामती येथील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात (दि.10) एक गुड न्यूज’ ऐकावयास मिळाली. खासगी रुग्णालयात दाखल झालेली एक गर्भवती महिला पॉझिटिव्ह असल्याने त्या खासगी रुग्णालयाने तिची प्रसुती करण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे तिला बारामती येथील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले. वैद्यकीय महाविद्यालय आणि महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी जोखीम घेत पॉझिटिव्ह गर्भवती महिलेली सुखरुप प्रसुती करून बारामतीकरांना आगळीवेगळी गुड न्यूज’ दिली. प्रसुतीनंतर आई व बाळाची प्रकृती ठणठणीत आहे.
दोन दिवसापूर्वी फलटण (जि. सातारा) येथील एका गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी बारामती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्या गर्भवती महिलेला करोनाची लक्षणे दिसत असल्याने तिची टेस्ट केली. यात महिला पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. याच दरम्यान महिलेला अचानक प्रसुतीच्या कळा सुरु झाल्या. मात्र ती पॉझिटिव्ह असल्याने खासगी रुग्णालयाने तिची प्रसुती करण्यास असमर्थता दर्शवली. तिला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
त्या महिलेच्या वाढत्या प्रसुतीकळा आणि आरोग्याची स्थिती पाहता तिच्या व बाळाच्या जीवासाठी धोक्याचा होता. ही गंभीर परिस्थिती ओळखून महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि बारामती वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी खबरदारी घेत तिची प्रसुती ग्रामीण रुग्णालयात करण्याचा साहसी निर्णय घेतला. त्यासाठी तातडीने स्वतंत्र ऑपरेशन थिएटरची व्यवस्था केली. पीपीई किट चढवून खबरदारी घेत महिलेची प्रसुती सुखरुप केली. महिलेने तीन किलो वजनाच्या गुटगुटीत बाळाला जन्म दिला. सध्या आई व बाळाची प्रकृती ठणठणीत असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
ही गुंतागुंतीची प्रसुती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापू भोई यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष जळक, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सचिन तोरवे, भूलतज्ज्ञ डॉ. सुरज जाधवर, महिला परिचारिका अमरजा मार्डिकर यांनी यशस्वी केली आहे.
- साडेपाच वर्षांत दीड लाख महिलांवर उपचार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून 2015 मध्ये शहरातील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय सुरू झाले आहे. साडेपाच वर्षांत साडेपंधरा हजाराहून अधिक प्रसुती झाल्या आहेत. त्यापैकी 10 हजार प्रसुती नॉर्मल झाल्या आहेत. साडेपाच वर्षांत दीड लाखांहून अधिक महिलांनी उपचार घेतले आहेत. एप्रिल ते ऑगस्टमध्ये 1 हजार 767 प्रसुती रुग्णालयात झाल्या आहेत. ऑगस्टमध्ये उच्चांकी 431 सुखरुप प्रसूती झाल्या आहेत. तालुक्यासह दौंड, इंदापूर, फलटण, माळशिरज, पुरंदर तालुक्यातून महिला उपचारासाठी या ठिकाणी येतात. विश्वासार्हता आणि आपुलकीने सेवा देणारे हे रुग्णालय म्हणजे गर्भवती महिलांसाठी दुसरे माहेरच बनले आहे.