मुंबई – राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन अहिर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन अहिर यांना शुभेच्छा दिल्या.
“माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम कराल, असा मला विश्वास आहे.’ असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
मुंबईमध्ये सचिन अहिर यांची मोठी ताकद पाहायला मिळाली आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणूक जिंकून देण्यात अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो. सचिन अहिर यांना त्याची बक्षिसीच शिवसेनेचे उपनेतेपद बहाल करुन देण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षपद भूषवत असताना सचिन अहिर यांनी पक्षाला मोठा धक्का दिला होता. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 25 जुलै 2019 रोजी सचिन अहिरांनी शिवबंधन हाती बांधले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत “मातोश्री’वर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.