नवीदिल्ली – उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये पुन्हा एकदा बर्फाचा डोंगर कोसळला आहे. मात्र या हिमस्खलनात केदारनाथ मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही ही दिलासादायक बाब आहे. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी याबाबत माहिती दिली.
केदारनाथ धामजवळील या आधीच्या घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे समोर आले. हवामानातही बदल होताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यातही केदारनाथ धामजवळ हिमस्खलनाचे भयानक दृश्य पाहायला मिळाले होते.विशेष म्हणजे त्या दिवशीही कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समोर आले होते.
एका वृत्तसंस्थेने केदारनाथ धाम परिसरात हिमस्खलनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भयानक दृश्य पाहायला मिळते. केदारनाथ धामजवळील परिसरात असलेल्या टेकड्यांवरून बर्फाचे पर्वत किती वेगाने खाली येत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शुक्रवारीच चार धाम यात्रेला गेलेले बिहारमधील चार जण पर्वत तुटल्यामुळे उत्तरकाशीमध्ये अडकले होते.
#WATCH | Uttarakhand: An avalanche occurred this morning in the Himalayan region but no damage was sustained to the Kedarnath temple: Shri Badrinath-Kedarnath Temple Committee President, Ajendra Ajay pic.twitter.com/fyi2WofTqZ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 1, 2022
ज्या भागात बर्फ कोसळण्याचा तडाखा बसला आहे तो भाग चोरबारी ग्लेशियर कॅचमेंट एरिया म्हणून ओळखला जातो. हे ठिकाण केदारनाथ मंदिर परिसरापासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. हे हिमालयातील तेच हिमनदीचे सरोवर आहे, जे २०१३ मध्ये उफाळून आले होते आणि त्यामुळे उत्तराखंडमध्ये सर्वात विनाशकारी पूर आला होता.