पिंपरी, दि. 20 – चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून 43 लाख रूपयांची रोकड, 4 लाख 97 हजार 625 रूपयांचे 7 हजार 336 मद्य, 94 हजार 750 रूपयांचा 3 किलो 584 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आचारसंहिता भंगाच्या 53 तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक सुरू आहे. या मतदार संघात 5,68,954 मतदार आपल्या मताचा हक्क बजाविणार आहेत. यामध्ये 3 लाख 2 हजार 946 पुरुष, 2 लाख 65 हजार 974 स्त्री व 34 तृतीयपंथी मतदार आहेत. 12 हजार 313 दिव्यांग मतदार व 80 वर्षावरील 9 हजार 926 मतदार समाविष्ट आहेत. तसेच, 331 अनिवासी भारतीय, 168 सैनिक मतदार या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार आहेत.
चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये 510 मतदान केंद्र सज्ज झालेली आहेत. 13 मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. एकूण मतदान केंद्राच्या 10 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार असून त्यात या संवेदनशील मतदान केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.
या निवडणूक प्रकियेच्या संचालनाच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत दोन सर्वसाधारण निरीक्षक, दोन पोलीस निरिक्षक व दोन खर्च निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 2550 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पहिले आणि दुसरे प्रशिक्षण झाले असून तिसरे प्रशिक्षण 25 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.
चिंचवड मतदार संघामध्ये 47 अधिकाऱ्यांची तसेच संवेदनशील मतदान केंद्रासाठी 15 सूक्ष्म निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच, निवडणूक प्रकिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपीच्या प्रत्येकी 1 कंपनी आरपीएफच्या 2 कंपन्या दाखल झालेल्या आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून मतदार संघासाठी 836 पोलीस व 169 होमगार्ड मार्फत बंदोबस्त पुरविला जाणार आहे.