शिवशंकर भाऊ माणसामधला देवमाणूस आणि संस्थानचा ‘मॅनेजमेंट गुरु’
शेगाव: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार विदर्भात आहेत. अमरावती येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी अकोला, शेगाव, नागपूर दौरा केला. दरम्यान विदर्भातील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण शेंगावच्या श्री. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी रोहित पवार गेले. त्यांनी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. शिवशंकर भाऊ पाटील यांच्यासोबत चर्चा केली. याबाबत रोहित पवारांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर माहिती दिली आहे.
रोहित पवार म्हणाले, संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. शिवशंकर भाऊ पाटील यांचे प्रयत्न आणि लोकांचे सकारात्मक विचार यांचा हा एकत्रित परिणाम आहे. भाऊंच्या कामाविषयी आदरणीय पवार साहेब आणि अन्य काही लोकांकडून मी ऐकलं होतं. पण काल गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आवर्जून भाऊंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. श्री. हर्षवर्धन सपकाळ आणि श्री. हरिहर पाटील हे विश्वस्तही यावेळी उपस्थित होते.
वयाच्या ८० व्या वर्षीही उत्तम तब्येत, दांडगी स्मरणशक्ती आणि संस्थानच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची त्यांची निस्वार्थी वृत्ती मनाला खूपच भावली. त्यांच्याशी बोलत असताना अनेक गोष्टींचा उलगडा करतानाच काही किस्सेही त्यांनी सांगितले.
आज गजानन महाराज संस्थानला एक प्रमुख संस्थान बनवणं, त्यांचं अभियांत्रिकी कॉलेज, ६५० एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रावर साकारलेला आनंदसागर सारखा पृथ्वीवरील स्वर्ग उभा करण्यामध्ये भाऊंचं योगदान खूप मोठं आहे. भाऊंना माणसामधला देवमाणूस आणि संस्थानचा ‘मॅनेजमेंट गुरु’ असं म्हणलं तरी ते चुकीचं होणार नाही. निःस्वार्थी भावनेने अविरत आणि प्रामाणिकपणे काम करण्याची भाऊंची बरोबरी कुणीही करणार नाही. त्यांना भेटून, त्यांच्याशी बोलून खूप आनंद झाला आणि समाधान वाटल्याचे रोहित पवार म्हणाले.