पुणे- धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे व्यवस्थापन करण्यासोबत शहरात कमी वेळात होणाऱ्या मोठ्या पावसामुळे नदीपात्रात होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत आवश्यक सूक्ष्म नियोजन करावे. नदीपात्रातील अतिक्रमण दूर करण्यात यावे. आपत्तीला प्रतिसाद देण्यापेक्षा आपत्ती आल्यास नुकसान होणार नाही, याचे नियोजन आधी करावे. नद्यांमधील अतिक्रमणे काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही प्राधिकरणाचे आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत सुहास दिवसे बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते.
प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. दिवसे यांनी सांगितले की, आपत्तीला प्रतिसादासाठी विविध यंत्रणांना आवश्यक साधने आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. यावेळी सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, महावितरण, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, कृषी, बीएसएनएल आदी विविध विभागांनी यावेळी केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.