रेठरे बुद्रुक – 20 हजाराच्या घरात लोकवस्ती असलेल्या रेठरे बुद्रुक गावात नागपूरच्या साकळीतून बाधित झालेला करोनाचा रुग्ण सापडला. तालुका प्रशासनाने तातडीने रेठरे बुद्रुकला हायअलर्ट जाहीर केला आहे. संपूर्ण गाव गल्ली बोळासह सर्वकाही सील केले आहे. गेल्या महिनाभरापासून प्रशासन ओरडून ओरडून सांगतयं बाबांनो, काळजी घ्या. बाहेर पडू नका. मास्कचा वापर करा. पणं रेठरेकर ऐकतील तर नवलच. शेवटी वेशीवर आलेल्या करोनाने रेठऱ्यात प्रवेश केला.
गावातील एक युवक करोना बाधित झाल्याची बातमी समजताच गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. त्या युवकाच्या जवळच्या संपर्कातील 20 लोकांना तातडीने कृष्णा हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर 32 जणांना होम क्वारांटाइन करण्यात आले आहे. रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील करोनाबाधित असणारा तो युवक कृष्णा हॉस्पिटल कराड येथे सिव्हिल विभागात नोकरीस आहे. या विभागातील एक जण कामानिमित्त नागपूरला गेला होता. तो लॉकडाऊन होण्यापूर्वी विमानाने परत आला. तो बाबरमाचीचा युवक करोना पॉझिटिव्ह असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
त्याच्या संपर्कात आलेले आणि बाधित म्हणून जाहीर झालेले सर्व कृष्णा हॉस्पीटलच्या सिव्हिल विभागातील कर्मचारी असल्याचे समोर येत आहे. तसेच रेठरे बुद्रुकचा बाधित युवकही याच विभागात कार्यरत असल्याने त्याची साखळी नागपूर रिटर्नशी निगडीत असल्याचे समोर येत आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने संपूर्ण गावातील अंतर्गत रस्ते तसेच जाधवामळा, आटकेला जाणारा रस्ता, कृष्णा कारखाना मुख्य रस्ता, आदींसह संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. बाहेरील लोकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच ग्रामस्तांनाही घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस व तालुका प्रशासनाने केले आहे.
रेठरेऱ्याला धसका
कृष्णा हॉस्पीटलच्या सिव्हिल विभागात कार्यरत असलेल्या बाबरमाचीच्या त्या करोनाबाधित रूग्णाची नागपूर रिटर्न साखळी नावानाव वाढत आहे. या साखळीत आता रेठरे बुद्रुकचाही समावेश झाला आहे. याच विभागात काम करणारा एक जण बाधित झाला असून अन्य दोघांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. त्यामुळे ही नागपूर रिटर्न करोनाची साखळी गावात किती जणांपर्यंत पोहचली आहे, याविषयी जिल्हा, तालुक्यासह गावातील घराघरात तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
करोनाबाधित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील घरातील व अन्य अशी 20 लोक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. तसेच लो रिस्क असणारी जवळची 32 जण होम कवारांटाइन करण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य सेवक, आशा, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका या सर्वांना प्रशिक्षण देऊन गावाचा सर्व्हे करण्यासाठी त्यांच्या एकूण 65 टीम तयार करण्यात आल्या आहेत. सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या व्यक्तींची तातडीने तपासणी करण्यात येत आहेत.
डॉ. मैथिली मिरजे , वैद्यकीय अधिकारी, रेठरे बुद्रुक,