पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांबाबत हरकतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी (दि. 29) पर्यंत तब्बल 1 हजार 306 हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. या याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै पर्यंतची मुदत आता निवडणूक आयोगाने 3 जुलै 2022 पर्यंत वाढविली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 31 मे 2022 पर्यंतच्या मतदार यादी फोडून 1 ते 46 प्रभागात मतदारांची विभागणी करण्यात आली आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 23 जूनला आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केली. हरकती घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली होती. त्यानुसार आता 3 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. बुधवारअखेर 1 हजार 306 हरकती आल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका व त्रुटी असल्याची ओरड शहरात सुरू झाली आहे.
आयोगाच्या सुचनेनुसार हरकती घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. बुधवारअखेर 1 हजार 306 हरकती आल्या आहेत. हरकतीबाबत जागेवर जाऊन पाहणी करण्यासाठी सव्वाशे कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
बाळासाहेब खांडेकर, सहाय्यक आयुक्त निवडणुक विभाग