मुंबई – अमेरिका आणि युरोपकडून रशियावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याबाबत रिझर्व बॅंक संवेदनाशील आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारशी संपर्कात असून रशियाशी व्यवहाराबाबत समन्वयाने योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे रिझर्व्ह बॅंकेने सूचित केले आहे.
भारत-रशिया दरम्यान मर्यादीत स्वरूपात व्यापार रुबल आणि रुपयाच्या माध्यमातून होण्याची शक्यता वृत्त माध्यमातून व्यक्त केली जात आहे. मात्र अशा प्रकारची औपचारिक यंत्रणा अजून तरी विकसित करण्यात आली नसल्याचे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. हा परराष्ट्र व्यवहार विभागाच्या अखत्यारीतील मुद्दा असून केंद्र सरकार यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना करून निर्णय घेण्याची शक्यता आहे.
त्यामुळे रिझर्व्ह बॅंक स्वतःहून निर्बंधावर परिणाम होईल असे काही करणार नाही. रिझर्व बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर त्यांनी या विषयावर बोलताना सांगितले की हा गुंतागुंतीचा मुद्दा आहे. याबाबत केंद्र सरकार योग्य वेळी निर्णय घेणे अपेक्षित आहे. जो काही निर्णय होईल त्यावर रिझर्व बॅंक आवश्यक ती कार्यवाही नंतर करेल.
युद्ध सुरू झाल्यानंतर भारत आणि रशिया दरम्यान व्यवहाराचा नवीन प्लॅटफॉर्म आणखी विकसित झालेला नाही. युद्ध सुरू होण्याच्या अगोदर कच्च्या तेलाच्या किमती 93 डॉलर होत्या. या किमतीवर भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन या भारतातील दोन कंपन्यांनी रशियातील तेल कंपन्याबरोबर कच्चे तेल खरेदीचे व्यवहार केले आहेत. हे व्यवहार कोणत्या चलनाच्या माध्यमातून केले जाणार आहेत, त्यासंदर्भात आम्हाला औपचारिक पातळीवर माहिती उपलब्ध नाही असे रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सूचित केले.