Sharad Pawar: अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे अनेक दिग्गज व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र काही राजकीय नेत्यांनी ह्या सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी श्रीरामजन्मभूमीच्या सरचिटणीस चंपत राय यांना पत्र लिहीत सोहळ्याचे निमंत्रण दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. तसेच त्यांनी 22 जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पाठवलेल्या निमंत्रणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पवार म्हणाले, “मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धा आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. त्याबद्दल उत्सुकता आहे. राम हे श्रद्धा आणि आस्थेचे प्रतीक आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी रामभक्त येथील त्यामुळे 22 जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आपण येणार आहे. तोपर्यंत राम मंदिराचे काम देखील पूर्ण झाले असेल.”
यावेळी शरद पवार यांनी धार्मिक मुद्द्यांवरून लोकांची मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अयोध्येतील जय श्रीराम, हनुमान यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, भाजप आणि आरएसएसकडून मतांसाठी फायदा करून घेतला जात असल्याची टीका केली.
दरम्यान, अभिषेक सोहळ्याची माहिती देताना रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी सांगितले की, अयोध्येतील राम मंदिरात मंगळवारपासून राम लल्लाच्या अभिषेक विधीला सुरुवात झाली आहे. 21 जानेवारीपर्यंत हा विधी चालणार आहे. 18 जानेवारीला गर्भगृहात रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच गेल्या अनेक दशकांपासून पूजल्या जात असलेल्या देवाची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यातच ठेवण्यात येणार आहे.