अयोध्या – अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचे काम जोरात सुरु आहे. जानेवारी 2024 मध्ये मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 ते 23 जानेवारी दरम्यान रामल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिराच्या गर्भगृहाचे सध्या बांधकाम सुरू आहे. राम मंदिराच्या गर्भगहाला सोन्याचा दरवाजा बसवण्यात येणार आहे. भव्य राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम जानेवारीमध्ये पूर्ण होईल, त्यानंतर मंदिर रामभक्तांसाठी खुले केले जाईल.
भव्य राम मंदिर निर्माणकार्य सध्या प्रगती पथावर आहे. राम मंदिरामध्ये एकूण 42 दरवाजे बसवण्यात येणार आहेत. राम मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा वगळता इतर दरवाजे महाराष्ट्रातील सागवान लाकडापासून तयार करण्यात येत आहेत. मंदिराच्या गर्भगृहातील सोन्याच्या दरवाज्यावर सुंदर मोर, चक्र आणि फुलांचे नक्षीकाम करण्यात येईल.
लाकडी दरवाज्यांवरही सुंदर नक्षीकाम करण्यात येणार आहे. राम मंदिर 1000 वर्षांहून अधिक काळ तग धरून राहावे यासाठी, मंदिर निर्माणाच्या कार्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मंदिराच्या आतील आणि बाहेरील भागात संगमरवरी दगड बसवण्यात येणार असून त्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात येणार आहे. या दगडांच्या मधे खास विटांचा वापर केला जाईल, यामुळे मंदिराच्या आतील तापमान कमी ठेवण्यास मदत होणार आहे.
भव्य राम मंदिर निर्माणकार्य
सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी राम मंदिराच्या बाजुने निर्णय दिला आणि राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी केली. 1 जून 2022 रोजी मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी करण्यात आली. डिसेंबर 2023 पर्यंत गर्भगृहाचे काम पूर्ण होईल. राम मंदिराची निर्मिती तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर भक्तांना राम लल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश खुला करण्यात येणार आहे.