मंचर-मंचर (ता. आंबेगाव) येथील उपजिल्हा रुग्णालय आणि महात्मा गांधी विद्यालय यांच्या वतीने मंचर शहरातून जागतिक एड्स दिनानिमित्त नुकतीच रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन उपप्राचार्य माधव कानडे यांनी केले.
महात्मा गांधी विद्यालयापासून रॅलीची सुरुवात झाली.संभाजी चौक मार्गे बाजारपेठ येथून शिवाजी चौक ते उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला. सध्या भारतातील बदलते कल्चर एचआयव्ही ला कारणीभूत ठरत आहे. संगत व आपले चारित्र्य चांगले असले पाहिजे. व्याभिचार थांबला की एचआयव्ही थांबायला मदत होईल, असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार यांनी व्यक्त केले. उपजिल्हा रुग्णालयात समुपदेशक सुहास मानेकर यांनी एड्स म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे काय आहे, तो होऊ नये.म्हणून काय काळजी घ्यावी याबाबत संपूर्ण माहिती दिली.
यावेळी सर्वानी आपली एचआयव्हीची तपासणी करुन घेण्याचे आवाहन मानेकर यांनी केले. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुमार भवारी यांनी तरुण युवक-युवतींची एड्स विषयी जबाबदारी किती मोठी आहे. याबाबत जनजागृती करण्याविषयी आवाहन केले. महात्मा गांधी विद्यालयाचे प्रा. एल. डी. उपार, ए.ए.शेलार, एम.डी.फलके, वाय.डी.चासकर, समुपदेशक सुहास मानेकर, औषध निर्माण अधिकारी संजय सोमवंशी पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वैशाली औंधकर, धीरज बागुल, अनिता पडवळ, सुनीता धारवड यावेळी उपस्थित होते.