जयपूर –राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पुढे करणार नसल्याचे मानले जाते. त्या बाबीवर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सोमवारी अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले. भाजपचा चेहरा ‘कमळ’ हे चिन्हच असेल, असे त्यांनी सूचित केले.
राजस्थानसह पाच राज्यांत लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या राजकीय रणसंग्रामाला सामोरे जाताना भाजपने चेहरे पुढे न करण्याची रणनीती आखल्याचे संकेत मिळत आहेत. त्या रणनीतीलाच मोदींनी राजस्थानच्या चित्तोडगढमधील सभेत बोलताना एकप्रकारे दुजोरा दिला.
तसेच, कमळ हीच भाजपची आशा असल्याचे म्हणत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनू इच्छिणाऱ्यांना इशाराही दिला. त्यांनी राजस्थानमधील सत्तारूढ कॉंग्रेस आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीकेची झोड उठवली. गेहलोत यांनी त्यांनी सुरू केलेल्या योजना बंद न करण्याची हमी माझ्याकडे जाहीरपणे मागितली. त्यातून कॉंग्रेसने निवडणुकीआधीच पराभव मान्य केल्याचे स्पष्ट होते.
कॉंग्रेसचे काऊंटडाऊन सुरू झाल्याची जाणीव गेहलोत यांना झाली आहे. त्यांनी आडवळणाने भाजपचे अभिनंदनच केले आहे. मीही गॅरंटी देतो की राजस्थानमधील योजना भाजप बंद करणार नाही. उलट, त्या योजनांमध्ये सुधारणा करेल, असे मोदींनी म्हटले.
येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मोदींनीही आठवडाभरात दुसऱ्यांदा राजस्थानचा दौरा करून त्या राज्यात दुसरी सभा घेतली.
मद्यप्रदेशातही 19 हजार कोटींचे प्रकल्प सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे सुमारे 19,260 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये दिल्ली-वडोदरा द्रुतगती मार्गाचे समर्पण, पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत बांधण्यात आलेल्या 2.2 लाखांहून अधिक घरांचे गृहप्रवेश आणि पंतप्रधान आवास योजना – शहरी अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे लोकार्पण, जल जीवन मिशन प्रकल्पांची पायाभरणी, आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानांतर्गत 9 आरोग्य केंद्रांची पायाभरणी, आयआयटी इंदूरच्या शैक्षणिक इमारतीचे लोकार्पण आणि संकुलातील वसतिगृह आणि इतर इमारतींसाठी पायाभरणी आणि इंदूरमध्ये मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी यांचा समावेश आहे.