मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty ) पती राज कुंद्राला (Raj Kundra) पोर्नोग्राफी प्रकरणामुळे अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याची अधिक चर्चा झाली होती. त्यानंतर आता राज कुंद्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मागील काही दिवसांपासून त्याची बॉलीवूडमधील एंट्रीबाबत चर्चा सुरू होती. अखेर आता राज कुंद्राच्या UT 69 या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
नुकतेच राज कुंद्राने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. याला कॅप्शन देत राज कुंद्रा म्हणाला की, “थँक्यु फराह आणि मुनव्वर. ‘इनसाइड’ स्टोरीची वेळ आली आहे! UT69 हा 3 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.” या व्हिडीओच्या शेवटी त्याने ‘सत्य घटनेवर आधारित’ असे लिहिले आहे.
हा व्हिडिओ पत्रकार परिषदेदरम्यान राज कुंद्रासोबत फराह खान आणि मुनव्वर फारुकी हे देखील दिसत आहे. यावेळी “हा चित्रपट कोणी बनवला आहे?” असा सवाल केला जातो. त्यावर फराह आणि मुनव्वर हे दोघेही राजकडे बोट दाखवतात. विशेष म्हणजे राज कुंद्रा पत्रकार परिषदेमध्ये देखील मास्क लावून बसलेला दिसला.
View this post on Instagram
दरम्यान, राज कुंद्राने चित्रपटात स्वत:ची भूमिका साकारली आहे. आर्थर रोड तुरुंगात असताना त्याच्यासोबत काय झाले, हे चित्रपटाच्या कथेत मांडले आहे. राजचा हा चित्रपट 3 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
काय आहे पॉर्न रॅकेट प्रकरण?
राज कुंद्रावर पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी राज कुंद्रासह 10 जणांवर कारवाई करण्यात आली. राजच्या अटकेपूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली होती. हे आरोपी पॉर्न फिल्म्स बनवायचे आणि फिल्म्स आणि वेब सिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करायचे. 2021 जुलै मध्ये अटक झाल्यानंतर त्याला 21 सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला होता.