मांजरी(प्रतिनिधी) – मांजरी बुद्रुक येथील रेल्वेगेटवर उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. मात्र, रेल्वे प्रशासन रेल्वेच्या मुख्य पटरीवर करत असलेले काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कामासाठी रेल्वेफाटक बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तेव्हा रेल्वे प्रशासनाने या कामाला गती देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुरेश घुले यांनी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले . यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रवीण शिंदे यावेळी उपस्थित होते.
मांजरी बुद्रुक रेल्वेगेटवर गेली तीन वर्षांपासून उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. रेल्वे रुळावरील उड्डाण पुलाचे काम रेल्वे प्रशासन कार्य करत असून यासाठी गेली आठ महिन्यापासून रेल्वेगेट वाहतुकीस पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे दररोज ४ ते ६ किलोमीटर लांबच्या अंतराने नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. त्यात नागरिकांचा वेळ वाया जात असून आर्थिक भुर्दंड ही सहन करावा लागत आहे.
काम सुरू झाल्यानंतर ते सहा महिन्यांत पूर्ण होईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र,प्रत्यक्षात काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कामाची गती अशीच राहिल्यास अजून सहा महिने काम पूर्ण होईल असे वाटत नाही. त्यामुळे रेल्वे प्रसासनाने कामाची गती वाढवून काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी दिला आहे.