पुणे – शहरातील विविध भागातून आर.एक्स हंण्ड्रेड दुचाकींची चोरी करून ग्रामिण भागात विक्री करणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी तब्बल सव्वा चारशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून बेड्या घातल्या. तर चोरीच्या गाड्या विकत घेणाऱ्या एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून विश्रामबाग, खडक, लष्कर, फरासखाना, अलंकार पोलिस ठाण्यातील वानचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत साडेचार लाख रुपये किंमतीच्या 17 दुचाकी जप्त केल्या आहेत.
आदित्य दत्तात्रय मानकर ( 19.रा. रेल्वे पटरीच्या बाजूला दातार कॉलनी, उरळी कांचन), मयूर ऊर्फ भैय्या पांडुरंग पवार ( 20, रा. उरळी कांचन बवरापूर रोड, तांबे वस्ती) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून वाहनचोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने त्यामध्ये दुचाकीची चोरीला जाण्यांची संख्या अधिक आहे.
पेठांच्या गर्दीतील परिसरातून चोरटे वाहने चोरी करत ्रआहेत.. त्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलिसांचे पथक वाहन चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस हवालदार हर्षल दुडम यांना समजले की, आरएक्स हंण्ड्रेड दुचाकींची चोरी करणारे चोरटे उरूळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात आहेत.
त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक राकेश सरडे यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशी आरोपींनी वाहनचोरींची कबुली देत चोरी केलेल्या दुचाकी हवाली केल्या. जानेवारीत देखील विश्रामबाग पोलिसांनी 17 दुचाकी जप्त केल्या होत्या.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, सहायक पोलिस आयुक्त वसंत कुवर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राकेश सरडे, पोलिस हवालदार हर्षल दुडम अंमलदार मयूर भोसले, प्रकाश बोरूटे, महावीर वलटे, सागर गोंजारी, आशिष खऱात, सत्तापा पाटील यांच्या पथकाने केली.
रेकी अन् रात्रीच्यावेळी चोरी..
चोरटे दिवसा रेकी करून रात्रीच्यावेळी पार्किंगमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला उभा केलेल्या दुचाकींची चोरी करत होते. चोरट्यांनी फक्त आरएक्स हंण्ड्रेड या दुचाकींचीच चोरी केली आहे. संबंधीत दुचाकीचे मॅडेल 1990 मध्ये बंद झाले आहे. मात्र तरुणाईमध्ये या दुचाकीची मोठी क्रेझ असून, सेकंड हॅण्ड दचाकीला मागणी आहे.
त्यामुळे चोरट्यांनी या दुचाकी चोरी करण्याचा सपाटा लावला होता. ग्रामिण भागात पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंत ते या दुचाकी विक्री करत होते. पायाचा जोर लावून काही सेकंदातच लॉक तोडून त्यांनी दुचाकी चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
बाजार, पेठ परिसरातून गाड्या चोरी जात होत्या. त्यानुसार पथके तयार करून आम्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 16 आरएक्स हंण्ड्रेड गाड्या जप्त केल्या आहेत. दोघे गाड्यांची चोरी करत होते. तर एकजण विक्री करत होता. आत्तापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.
– संदीपसिंह गिल्ल, पोलिस उपायुक्त झोन एक