पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महावितरणच्या मंडई येथील उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी भूमिगत वीजवाहिनी पुणे महापालिकेने केलेल्या पाइपलाइन खोदकामासाठी १५ दिवसांपूर्वी तोडली होती. त्याच ठिकाणी पुन्हा रविवारी (दि. ७) रात्री ९ वाजता बिघाड झाला. त्यामुळे मंडई परिसरातील तुळशीबाग, शनिपार, विश्रामबागवाडा आदी परिसरात खंडित झालेला १५०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. वारंवार वीजपुरठा खंडित होत असल्याने या परिसरातील नागरिक व व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, मंडई उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या पर्यायी वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ५ मीटर खोदाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी दि. १ एप्रिलला महावितरणकडून लेखी परवानगी मागण्यात आली. मात्र, पालिकेकडून ती मिळाली नसल्याने पर्यायी स्वरूपात वीजपुरवठा उपलब्ध करून देता आला नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे.
पर्वती विभागांतर्गत मंडई उपकेंद्रातून मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रोड आदी परिसरातील सुमारे १७ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्राला रास्तापेठ व नवी पेठ या दोन स्वतंत्र २२ केव्ही भूमिगत वाहिन्यांद्वारे वीजपुरवठ्याची सोय आहे. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी यातील रास्तापेठ वीजवाहिनी पुणे महानगरपालिकेच्या पाइपलाइनच्या खोदकामात तोडण्यात आली होती. संबंधित कंत्राटदाराने या वाहिनीच्या दुरुस्तीचे व जोडणीचे काम केले होते. त्याच दरम्यान नवी पेठ वीजवाहिनीमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मंडई उपकेंद्राच्या वीजपुरवठ्याचा पर्यायी स्रोत बंद झाला.
त्यामुळे मंडई उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडल्याने सुमारे १७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यानंतर महावितरणकडून मंडई उपकेंद्राच्या ६ पैकी ५ वीजवाहिन्यांना तासाभरात अथक प्रयत्नांनी पर्यायी स्वरूपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, उन्हाळ्यामुळे वीजभार वाढल्याने महालक्ष्मी या वीजवाहिनीवरील तुळशीबाग, शनिपार, विश्रामबाग वाडा, नागनाथ पार येथील १५०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. तो सकाळच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला.