Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव
Pune Water Supply: पर्जन्यमानातील अनिश्चितता आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन २०२६-२७ साठी २१.३४ टीएमसी पाणी देण्याची महापालिकेची मागणी.

Pune Water Supply- खडकवासला धरणसाखळीतील सद्यस्थितीतील पाणीसाठा, कालव्याची आवर्तने आणि पर्जन्यमानातील संभाव्य अनिश्चितता लक्षात घेऊन पुणे महापालिकेसाठी पाणीवाटपाचे नियोजन कळवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शहराची वाढती लोकसंख्या, समाविष्ट गावे आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता, सन २०२६-२७ साठी आवश्यक असलेल्या २१.३४ टीएमसी पाण्याच्या उपलब्धतेबाबत महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे विचारणा केली आहे.
महापालिकेने ३० सप्टेंबर रोजी पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठविले आहे. शहराच्या हद्दीत २०१७ मध्ये ११ गावे आणि २०२१ मध्ये २३ गावे समाविष्ट झाली आहेत. या सर्व गावांना सध्या महापालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेऊन महापालिकेने बिगरसिंचन पाणी आरक्षण वाढविण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी प्रस्ताव सादर केला होता.
कालव्याच्या आवर्तनामुळे चिंता
खडकवासला धरणसाखळीतील मुठा उजवा कालव्यातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेसाठी उपलब्ध पाणी, कालव्याची आवर्तने, विविध पाणीवापराच्या गरजा आणि आगामी पावसाची अनिश्चितता यांचा समन्वय साधून नियोजन करण्याची गरज महापालिकेने व्यक्त केली आहे. भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहरासाठी आवश्यक पाणी आरक्षित ठेवण्याचे नियोजन करावे, तसेच त्याबाबत महापालिकेस विश्वासात घ्यावे, अशी विनंतीही महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
कालवा समितीच्या बैठकीकडे लक्ष?
धरणातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात कालवा समितीची बैठक घेतली जाते. या बैठकीत शहराचा पाणीकोटा निश्चित केला जातो. एकीकडे राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने राज्य शासनाने धरणातील पाणी राखीव ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे या बैठकीत शहर आणि जिल्ह्यासाठी किती पाणी देणार, हे निश्चित होणार आहे.
त्यामुळे पुणेकरांसह, जिल्ह्यातील सिंचन योजना, तसेच शेतकऱ्यांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. आधी विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणूकांमुळे मागील वर्षी कालवा समितीची बैठक झाली नव्हती. परिणामी, वर्षभर पाण्याचे नियोजन निश्चित न झाल्याने यंदा उन्हाळ्यात पुणेकरांना दिवसाआड पाणीकपातीचा सामना करावा लागला होता.





