Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी ‘पवार विरुद्ध पवार’ ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव
Someshwar Election: २१ संचालक जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात; मतविभाजनाचा कोणाला फायदा अन् कोणाला तोटा? बारामतीचे लक्ष लागून.

Someshwar Election- सोमेश्वरनगरच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्रातील निवडणूक राहिलेली नाही. तर, बारामतीच्या स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांचीही ती महत्त्वाची परीक्षा ठरत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यानंतर २१ संचालक जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात असून सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र राजकीय मांडण्या स्पष्ट झाल्या आहेत.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पवार कुटुंबातील दोन राजकीय प्रवाह थेट आमनेसामने आले असतानाच पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे करून तिसरा राजकीय पर्याय निर्माण केला आहे. त्यामुळे पारंपरिक दोन ध्रुवांऐवजी मतविभाजनाची शक्यता असलेली तिरंगी लढत आकाराला आली आहे.
सुनेत्रा पवारांसमोर संघटन टिकविण्याचे आव्हान
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलसमोर विद्यमान राजकीय आणि संघटनात्मक रचना कायम ठेवण्याचे आव्हान आहे. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी विरोधकांनी अजित पवार यांच्या नावाचा वापर न करता स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडली आहे. कारखाना हा सभासदांचा असून विकासाचे श्रेयही सभासदांचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या प्रचारात कारखान्याचा कारभार, विकास आणि संघटनात्मक सातत्य हे मुद्दे कितपत केंद्रस्थानी राहतात, याकडे लक्ष आहे.
युगेंद्र पवारांकडून ‘स्वतंत्र राजकीय मांडणी’
युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्र ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ उभे केले आहे. प्रचाराच्या प्रारंभीच त्यांनी सभासदांचे हित, कारखान्याचा कारभार आणि पारदर्शकतेचे मुद्दे पुढे केले आहेत. युगेंद्र पवार यांच्या भूमिकेमुळे सोमेश्वरच्या निवडणुकीला पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा राजकीय संदर्भ मिळाला आहे. मात्र, त्यांच्यासमोर आव्हान आहे ते या राजकीय भूमिकेचे मतदारसंघनिहाय संघटनात रूपांतर करण्याचे.
जगतापांचा स्वतंत्र पॅनेल
समीकरणातील तिसरा घटक, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र भूमिका घेत भाजपच्या पाठिंब्याने पॅनेल उभे केले आहे. या निर्णयामुळे निवडणुकीतील सरळ द्विपक्षीय लढतीचे रूपांतर तिरंगी लढतीत झाले. जगताप यांच्या पॅनेलभोवती अजित पवार यांच्या नावाचा आणि वारशाचा राजकीय संदर्भही प्रचारात पुढे आला आहे. सुनेत्रा पवार यांनी विरोधकांनी अजित पवारांचे नाव वापरू नये, अशी भूमिका मांडल्यानंतर जगताप यांनी ‘अजितदादा सभासदांच्या मनात आहेत’ अशी प्रतिक्रिया दिली.
निर्णायक ठरणार ‘स्थानिक’ समीकरण
सोमेश्वरच्या निवडणुकीत राज्यस्तरीय राजकारणाचा प्रभाव असला तरी अंतिम निकालासाठी गावनिहाय संघटन, सभासदांशी वैयक्तिक संपर्क, उमेदवारांची स्थानिक स्वीकारार्हता आणि पॅनेलची मतांची सांगड हे घटक महत्त्वाचे ठरणार आहेत. तिरंगी लढतीत प्रत्येक पॅनेलला आपापला मताधार एकसंध ठेवण्याबरोबरच स्थानिक पातळीवरील नाराजी, बंडखोरी आणि मतविभाजनाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रचारातील घोषणांपेक्षा मतदानाच्या दिवशी सभासद कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देतात, हे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
बदलत्या समीकरणांचे प्रतिबिंब
सोमेश्वरच्या निवडणुकीत तीन चेहरे, तीन राजकीय मांडण्या आणि एकच सत्ता केंद्र कारखान्याचे संचालक मंडळ. त्यामुळे ही निवडणूक केवळ २१ जागांची नसून बारामतीच्या सहकार राजकारणातील बदलत्या समीकरणांचे प्रतिबिंब ठरणार आहे. सोमेश्वर कारखान्याची निवडणूक केवळ पॅनेल विरुद्ध पॅनेल नसून सहकारातील नेतृत्व, स्थानिक संघटन आणि पवार कुटुंबातील बदललेल्या राजकीय समीकरणांची परीक्षा ठरत आहे.






