MCE Society Azam Campus : पुण्यातील 27 पालिका शाळांतील डिजिटल शिक्षणाची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली पाहणी
MCE Society Azam Campus : एम.सी.ई. सोसायटीच्या आझम कॅम्पसला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची भेट. पुणे पालिकेच्या २७ शाळांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत डिजिटल प्रशिक्षणाची पाहणी.

MCE Society Azam Campus : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (एम.सी.ई. सोसायटी) आझम कॅम्पसला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी विशेष भेट दिली. पुणे महानगरपालिकेच्या २७ शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मोफत डिजिटल साक्षरता आणि तंत्रज्ञान प्रशिक्षणाची त्यांनी पाहणी केली.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संगणक साक्षरता, पायथन प्रोग्रामिंग, हार्डवेअर रिपेअरिंग, स्क्रॅचच्या माध्यमातून कोडिंग, रोबोटिक्स, आयओटी, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण दिले जाते. राज्यपाल बागडे यांनी प्रशिक्षण वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याचे त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते पाशा पटेल हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आझम कॅम्पसच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली.
एम.सी.ई. सोसायटी आणि डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या वतीने आबेदा इनामदार यांच्या हस्ते राज्यपाल बागडे यांचा पुणेरी पगडी, उपरणे, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पाशा पटेल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
राज्यपाल बागडे यांनी पालिका शाळांमधील वंचित विद्यार्थ्यांना संगणक, कोडिंग आणि रोबोटिक्सचे मोफत प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. केवळ परीक्षेपुरते शिक्षण न घेता विद्यार्थ्यांनी व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करावीत. या कौशल्यांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्वावलंबन वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि तरुणांमध्ये आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी प्रत्यक्ष कौशल्ये महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पाशा पटेल यांनी तरुणांनी कृषी क्षेत्राशी संबंधित प्रकल्प, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तरुणांची ऊर्जा आणि कृषी क्षेत्राचा विकास यामुळे मजबूत राष्ट्र उभारणीला मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
हा कार्यक्रम एम.सी.ई. सोसायटीच्या अध्यक्ष आणि डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या कुलपती आबेदा इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. राज्यपालांच्या भेटीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी संस्था पुढेही काम करत राहील, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.





