पुणे – ससून रुग्णालयाच्या पार्किंगमधून रुग्णांच्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. बंडगार्डन पोलीस ठाण्यात अवघ्या काही दिवसांत चार गुन्हे दाखल झाले होते. या गुन्हयांचा तपास करता एका रुग्णवाहिका चालकाला चोरीच्या दुचाकीसह अटक करण्यात आली. त्याच्याकडून सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सतीश मारुती गंगावणे ( पिंप्री गुरव, तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
ससून रुग्णालयाच्या पार्किंगमधून मागील काही महिण्यांपासून वाहच चोरीच्या घटना वाढल्या होत्या. बंडगार्डन पोलीस ठाण्यात चार वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. येथे पे ऍण्ड पार्क वाहनतळ असूनही चोऱ्या झाल्या होत्या. यामुळे पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरु केला होता. दरम्यान हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई मनोज भोकरे यांना खबर मिळाली की रेल्वे हॉस्पिटल समोर आरोपी सतीश मारुती गंगावणे हा दुचाकीवर संशयितरीत्या उभा आहे. त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने दुचाकी ससून हॉस्पिटल येथुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
त्याच्याकडे अधिक तपास केला असता तो खाजगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणुन कामास होता. तो गावाकडील रुग्ण ससून रुग्णालयात उपचारासाठी घेऊन येत होता. यामुळे त्याला ससून रुग्णालयातील वाहन पार्किंगची पुरेशी माहिती होती. यामुळे त्याने ससून रुग्णालयातून गाडी चोरण्याचा धडाका लावला. त्याने एक गाडी समर्थ पोलीस स्टेशन तसेच मिरज पोलीस स्टेशनच्या हद्दीतूनही चोरली होती. त्याला दारुची व्यसन असल्याने पैशासाठी तो दुचाकी चोरायचा. या दुकाकी तो त्याचा मुळ गाव कर्जत येथे नेऊन अवघ्या दहा बारा हजारात विकायचा. खरेदी करणाऱ्यांना तो गाडीची कागदपत्रे काही दिवसांत आणून देतो असे सांगत होतो. मात्र त्याने कागदपत्रे आणून न दिल्याने खरेदीदारांनी त्याला दुचाकी पुन्हा परत केल्या होत्या. त्यांनी त्याच्याकडे पैसे परत मागितले होते. मात्र ते तो देण्यास टाळा टाळ करत होता. अखेर तो चोरीच्या दुचाकीसह पोलिसांच्या सापळ्यात अडकला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस अंमलदार मोहन काळे, सुधीर घोटकुले, शंकर संपते, अमोल सरडे, अनिल कुसालकर, मनोज भोकरे , शिवाजी सरक, किरण तळेकर, सतिश मुंडे, संजय वणवे, सागर घोरपडे, शिवाजी राणे यांचे पथकाने केली.