पुणे, दि.22 -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीधर गटातील अधिसभा (सिनेट) निवडणुकीत भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंचच्या पॅनेलने 10 पैकी 8 जागा जिंकून बाजी मारली आहे. या निकालानंतर विद्यार्थी, कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या खणखणाटासह फटाक्याच्या आतषबाजीने जल्लोष साजरा केला.
पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या एकूण 10 जागांसाठी 37 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. खुल्या प्रवर्गातील 5 जागांसाठी 18, अनुसूचित जातीच्या 1 जागेसाठी 5, अनुसूचित जमातीच्या 1 जागेसाठी 4, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या 1 जागेसाठी 4, इतर मागासवर्गीय 1 जागेसाठी 4, महिला प्रवर्गातून 1 जागेसाठी 2 याप्रमाणे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपशी संबंधित विद्यापीठ विकास मंच, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले परिवर्तन पॅनेल, कॉंग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेल, हिंदू महासभा या पॅनेलने आपले उमेदवार निवडणुकीत उतरवले होते.
यंदाच्या निवडणुकीत 88 हजार 900 मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यातील 23 हजार 866 जणांनीच मतदान केले. त्यामुळे एकूण केवळ 26.85 टक्केच मतदान झाले होते. विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडासंकुलात मंगळवारी (दि.22) सकाळी साडेआठ वाजता 72 काऊंटरवर मतमोजणीला सुरुवात झाली. सुमारे 300 प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले होते. सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण आदींसह नियोजनबध्द पद्धतीने ही मतमोजणी प्रक्रिया करण्यात आली. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरुच होती. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तमपणे कामकाज पाहिले. मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा निकाल लवकर लावण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने विशेष नियोजनही केले होते.
सकाळी 11 वाजता मतपत्रिकांची विभागणी करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांच्या नावानुसार केलेल्या बॉक्समध्ये त्यांना पहिल्या पसंतीच्या मिळालेल्या मतपत्रिका टाकण्यात आल्या आहे. त्यानंतर त्यांची मोजणी करण्यात आली. राखीव गटातील निकाल आधी जाहीर करण्यात आले. दुपारी 3 वाजता अनुसूचित जमाती प्रवर्गातील पहिला निकाल जाहीर करण्यात आला. सांयकाळी 6 वाजेपर्यंत सात जागांचे निकाल जाहीर करण्यात आले होते.
मतदानाचा कोटा निश्चित
प्रत्येक प्रवर्गातील विजयासाठी मतदानाचा कोटा निश्चित करुन देण्यात आला होता. यात राखीव प्रवर्गासाठी पहिल्याच फेरीत विद्यापीठ विकास मंचच्या सर्वच उमेदवारांनी प्रथम क्रमांकाची मते प्राप्त करत पाचही राखीव जागा जिंकण्यात यश मिळविले. खुल्या प्रवर्गात सर्वाधिक 18 उमेदवारांचा समावेश होता. यात विजयासाठी 3 हजार 654 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.
यातील पहिल्यास फेरीत विद्यापीठ विकास मंचच्या प्रसेनजीत फडणवीस यांना 4 हजार 447 व सागर वैद्य यांना 3 हजार 711 मते मिळाली. अन्य उमेदवारांना कोटा गाठता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीसाठी सायंकाळी 6.30 वाजता दुसरी फेरी सुरू करण्यात आली होती. दरम्यान, खुल्या प्रवर्गातील उर्वरित जागासाठी दुसऱ्या फेरीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, विजयी उमेदवारांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, विशेष कार्याधिकारी प्रमोद भडकवाडे, निवडणूक अधिकारी डॉ.वैशाली साकोरे, ज्ञानेश्वर साळुंखे, प्रदीप कोळी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठ विकास मंचचे समन्वयक राजेश पांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. दरम्यान, उर्वरित दोन जागांसाठी रात्री साडेअकरा वाजता मतमोजणीची दहावी फेरी सुरू होती.
काही वेळ गोंधळ
मतमोजणीदरम्यान काही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी काही कारणास्तव आक्षेप घेतल्याने गोंधळही निर्माण झाला होता. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पडताळणी करत आक्षेप खोडून काढले. काही ठिकाणी दुसऱ्यांदा मोजणी करण्याची वेळही ओढावली होती. त्यामुळे काही वेळानंतर गर्दी कमी करण्यात आल्याने गोंधळ शांतही करण्यात आला.
जल्लोष केल्याने कारवाई होणार का?
या निकालानंतर विद्यापीठात पदयात्रा, जल्लोषास पोलिसांनी मज्जाव केला होता. याप्रकरणी काही विद्यार्थी संघटनांना नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. तरीही मतमोजणी केंद्राच्या बाहेरच कार्यकर्त्यांनी ढोलताशांचा आवाज खणखवत घोषणाबाजीही केली. दरम्यान, यांच्यावर पोवीस कारवाई करणार का, असा प्रश्न
स्टुडंट हेल्पिंग हॅंड या संघटनेच्या कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला आहे.