पुणे – महापालिकेने भिडेपूल ते डेक्कन बसथांब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे येथून रस्ताच बंद होणार आहे. हा निर्णय वाहतूक कोंडीत भर टाकणारा ठरणार आहे. दिवाळीच्या खरेदीनिमित्त होणारी वर्दळ लक्षात घेता, हे काम दिवाळीनंतर करावे, अशी मागणी पुणेकर करत आहेत.
डेक्कन जिमखाना तसेच जंगली महाराज रस्त्यावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी यापूर्वी पावसाळी वाहिनी टाकण्यात आली होती. मात्र, मेट्रोच्या कामात तिची तोडफोड झाली. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन डेक्कन भागात तळी साचली होती. त्यामुळे तेथे वाहिनी नव्याने टाकण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील दोन महिने टप्प्याटप्प्याने काम केले जाणार असल्याने हा रस्ता बंद ठेवला जाणार आहे.
डेक्कन परिसरातून सर्व दुचाकी याच रस्त्याने शहराच्या मध्यवर्ती भागात येतात. त्याच वेळी खरेदीसाठी आलेली वाहने भिडे नदीपात्रात दोन्ही बाजूला उभी केली जातात. तर लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता तसेच अंतर्गत भागात कोंडी होत असल्याने छोटी वाहने तसेच नदीपात्रातील वाहने डेक्कनकडून शहराबाहेर पडतात. मात्र, आता हा रस्ता बंद झाल्याने या वाहनांना पेठांमधून बाहेर पडावे लागेल. तर डेक्कनकडून येणाऱ्या वाहनांना टिळक चौकातून लक्ष्मी रस्ता तसेच कुमठेकर रस्त्याने शहरात यावे लागेल. परिणामी, पेठांच्या रस्त्यांवर आणखी वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे.
“महापालिकेने पावसाळी वाहिनीचे काम सुरू केले असले, तरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मल:निस्सारण विभागाशी चर्चा करून दिवाळी काळात रस्ता सुरू ठेवला जाईल. त्याबाबत संबंधित खात्यास सूचना दिल्या जातील.” – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका