पुणे – शहरात महापालिकेकडून विकास आराखड्यानुसार तयार करण्यात आलेले सुमारे १०० हून अधिक रस्ते अवघ्या १०० ते ५०० मीटर जागा मिळत नसल्याने अर्धवट अवस्थेत आहेत. या रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी महापालिकेकडून मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. असे असतानाच, महापालिकेच्या पथ विभागाने एक इंचही जागा ताब्यात नसताना धायरी येथील एका रस्त्यासाठी तब्बल ५० लाखांची निविदा काढली आहे.
त्यामुळे, ताब्यात असलेल्या अवघ्या २०० मीटर जागेवर महापालिका हा खर्च करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. धायरी गावात जाण्यासाठी सिंहगड रस्त्यावरून एकच रस्ता आहे. महापालिकेकडून 23 गावांसाठीच्या २००८ च्या विकास आराखड्यात धायरी गावासाठी प्रस्तावित केलेला हा ३० मीटर रस्ता आहे.
काय आहे प्रकरण?
धायरी उड्डाणपूलाच्या १०० मीटर पुढे गेल्यानंतर मॅक्डोनाल्डच्या समोरील बाजूस असलेल्या फर्निचर दुकानांपासून सावित्री गार्डनपर्यंत सुमारे १२०० मीटर लांबीचा हा रस्ता आहे. सद्यस्थितीत सुरुवातीलाच तो ९ मीटर रूंद आणि अवघा ७० ते ८० मीटर प्रत्यक्ष जागेवर तुकड्या तुकड्यात आहे. त्यामुळे हा रस्ता विकसित झाल्यास धायरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. रस्ता सुमारे १२०० मीटर लाबींचा असून यात जवळपास १५० जागा मालक आहेत.
महापालिकेने हा रस्ता ३० मीटर रुंदीचा आखलेला आहे. शेतीची जागा जात असल्याने या आखणीला काही जागा मालकांचा विरोध आहे. काही जागामालकांची सर्वच जमीन घेतली जात असल्याने सर्वांची समान जागा न घेता पर्याय आखावा, अशी मागणी होत असून सध्याच्या रस्ता आखणीला विरोध होत आहे. त्यावर, संबंधित जागा मालकांची बैठक घेतल्यानंतर पालिकेच्या वतीने त्यावर तोडगा म्हणून या रस्त्याचा नकाशा, फाळणी डीपीवर इम्पोज करून आखणी निश्चित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
थेट निविदा
ही बैठक झाल्यानंतर महापालिकेकडून पुढील प्रक्रिया करणे अपेक्षित असताना थेट या रस्त्याच्या कामाची ५० लाखांची निविदा काढली आहे. हा रस्ता करताना अनेक शेतकर्यांच्या जागांचे दोन तुकडे होणार आहेत. त्यामुळे रस्ता योग्य पध्दतीने आखणी करण्याची मागणी होत आहे. असे असतानाच, जागा मिळेल तसा रस्ता करू, अशी भूमिका घेत पथ विभागाने थेट निविदा काढल्याने मिसिंग लिंकमध्ये आणखी एका रस्त्याची भर पाड्ण्याचा घाट घालण्यात आला आहे.