कोथरूड पोलिसांकडून तपास सुरू; फरार आरोपी मोहम्मद आलमच मास्टर माइंड
संजय कडू
पुणे – कोथरुड पोलिसांनी अटक केलेले इम्रान खान व मोहम्मद युनीस साकी हे दोन दहशतवादी दहशतवादाच्या “मॉड्युल’चाच एक भाग असल्याचे पुढे आले आहे. मॉड्युलसाठी स्लीपर सेल म्हणून ते काम करीत होते. तर, त्यांचा फरार साथीदार हा स्लीपर सेलचा मास्टर माइंड असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे, त्यांचा दुचाकी चोरण्याचा उद्देश हा दहशतवादी कारवाईसाठीच होता, हे ही स्पष्ट झाले आहे. यामुळे ते दुचाकीचा वापर दहशतवादी कृत्यासांठी कशाप्रकारे व कुठे करणार होते? हे शोधले जात आहे. पुण्यात नऊ वर्षापूर्वी फरासखाना पोलीस ठाण्यासमोर चोरलेल्या दुचाकीचा वापर करुन स्फोट घडविण्यात आला होता. यामुळे तपास यंत्रणांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे.
रिझवानच स्लिपर सेलचा प्रमुख…
राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या (एनआयए) रेकॉर्डवरील दोन्ही दहशतवादी असून त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात मिठानगर येथे ते पसार झालेला दिल्लीचा मुळचा रहिवासी असलेला मोहम्मद शाहनवाज शफीउररहमान आलम सोबत मागील दीड वर्षांपासून वास्तव्यास होते. यादरम्यान दोघेही अटक आरोपी आलमच्या मार्फत ग्राफीक डिझाइनचे काम कोंढवा परिसरात करत होते. इतर वेळी तीघेही घरातच असत. त्यांच्या सोसायटीच्या इतर सदस्यांशी कोणताही संपर्क नव्हता. दरम्यान, आलमचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. यामुळे तो आजवर कोणत्याची तपास यंत्रणांच्या रडारवर आला नाही. यामुळे त्याच्या बद्दल तपास यंत्रणांकडे कोणतीच माहिती नाही. दरम्यान, राष्ट्रीय यंत्रणांनी सर्व लक्ष अटक आरोपींच्या चौकशीकडे दिले आहे. पुणे पोलीस फरार आरोपी आलमच्या मागावर आहेत.
दुचाकीची चोरी घातपाताच्या दृष्टीनेच
तपास यंत्रणांतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अटक आरोपींची पार्श्वभूमी ही दहशतवादाची आहे. त्यांचे व्यवस्थीत ब्रेन वॉश केले गेले आहे. त्यांनी रहात्या परिसरातून दुचकी चोरण्याचा प्रयत्न केला नाही. जेणेकरुन पकडले गेल्यास स्थानिक पोलिसांच्या नजरेत येणार नाही. यामुळे त्यांनी राहत्या परिसरापासून दूरवरील परिसर दुचाकी चोरीसाठी निवडला. ही चोरलेली दुचाकी स्वत:च्या वापरासाठी तसेच विकून पैसे कमावण्यासाठी चोरलेली नसणार, हे स्पष्ट आहे. त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता ते चोरलेल्या दुचाकीचा वापर घातपातासाठीच करणार हे उघड आहे. यामुळे हा वापर कोठे व कसा करणार होते हा तपासाचा भाग आहे. त्यांचे टार्गेट काय होते हे शोधले जात आहे.
लॅपटॉपमध्ये देशविघातक साहित्य…
कोथरुड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रदीप चव्हाण व अमोल नझन यांनी नाकाबंदी दरम्यान कोथरुड परिसरात बधाई चौकात मोटारसायकल चोरी करताना तीन संशयित चोरांना मंगळवारी मध्यरात्री पकडले. त्यावेळी आलम पोलीसांच्या तावडीतून पसार झाला. पोलिसांनी त्यांच्या घरझडतीतून जप्त केलेला लॅपटॉप तपासला असता, प्रत्येक फाइलला लॉक करण्यात आल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी सायबर तज्ञांच्या मदतीने सर्व फाइलचे डिजीटल लॉक तोडून माहिती तपासली. त्यात इस्लामिक साहित्य व देशविघातक माहिती मिळून आली. यामध्ये ब्रेन वॉश करणाऱ्या लेक्चरचे काही व्हिडिओही हाती लागले आहेत.