विजय जरधारी यांना वसुंधरा सन्मान जाहीर
डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीला वसुंधरा मित्र पुरस्कार
पुणे – यंदाचा वसुंधरा सन्मान उत्तराखंडमधील शाश्वत जमीन व्यवस्थापन तज्ज्ञ आणि शेतकरी विजय जरधारी यांना तर वसुंधरा मित्र हा संस्थेसाठीचा पुरस्कार तेलंगणा आणि हैद्राबाद येथील डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीला जाहीर करण्यात येत आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे, महोत्सवाचे ‘फेसिलिटेटर’ आनंद चितळे, क्युरेटर डॉ. गुरुदास नूलकर आणि ‘महोत्सवाचे संयोजक’ वीरेंद्र चित्राव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
सतरावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नऊ ते १२ जानेवारी या कालावधीत अॉनलाइन पद्धतीने होणार आहे. सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज हा या महोत्सवाचा विषय असून या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध पर्यावरण चित्रपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक जेसन टेलर यांच्या हस्ते तर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यावरण कार्यकर्ते, लेखक आणि सँक्चुअरी नेचर फाऊंडेशनचे संस्थापक बिट्टू सहगल यांच्या हस्ते होणार आहे.
‘जेसन टेलर यांनी द सोर्स प्रोजेक्ट’ अंतर्गत दिग्दर्शित केलेला ‘नटबार सारंगी’ हा या महोत्सवाचा उद्घाटनाचा चित्रपट आहे. तर डी. डब्ल्यु. प्लॅनेट ए दिग्दर्शित ‘कोपनहेगन : शहराला पुरापासुन कसे वाचवले ? ‘ या चित्रपटाने या महोत्सवाचा समारोप होणार आहे. महोत्सवादरम्यान १०० पेक्षा अधिक चित्रपट दाखवले जाणार असून यामध्ये पर्यावरण, शेती, नैसर्गिक साधन संपत्ती, जल व्यवस्थापन, जंगल, वन्यजीव जैवविविधता, अन्न निर्मिती अशा बहुआयामी चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. हा महोत्सव जगभरातील रसिकांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
भारतासह आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि दिग्दर्शकांचा समावेश हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य यामध्ये मराठी चित्रपट देखील दाखविले जाणार आहेत. देशविदेशातून या महोत्सवाच्या नोंदणीसाठी भरघोस प्रतिसाद मिळत आहे. महोत्सव पहाण्यासाठी आजपर्यंत ८० हजारांहून जास्त नोंदणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.भारताबाहेरून जवळजवळ ५४ ठिकाणांहून महोत्सवासाठी नोंदणी झाली आहे.