पुणे-जिल्हानिहाय जात पडताळणी समित्यांना महसूल विभागाने दिलेल्या पदोन्नती मधून एकाच दिवशी 14 अधिकारी (अध्यक्ष) मिळाले आहेत. महसूल विभागाने तात्पुरत्या पदोन्नतीची एकूण 20 अधिकाऱ्यांची यादी बुधवारी (दि.22) निर्गमित केली असून यामधून तब्बल 14 अधिकाऱ्यांना विविध जिल्ह्यांतील पडताळणी समित्यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्यात एकूण 36 जातपडताळणी समित्या जिल्हा स्तरांवर कार्यरत असून, जवळपास 20 जिल्ह्यात प्रभारी राज असल्याने जातपडताळणी प्रक्रियेस काही प्रमाणात विलंब लागत होता. त्या 20 पैकी आता 14 ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने जातपडताळणी प्रक्रियेचा वेगही वाढणार आहे. दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकताच जातपडताळणीची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत व ऑनलाइन करून पासपोर्टच्या धर्तीवर राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे.