पुणे : जपान सरकारतर्फे दरवर्षी घेतल्या जाणार्या प्रतिष्ठित मोंबुशो शिष्यवृत्ती परीक्षेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागातील 8 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. शिष्यवृत्तीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जपान येथील विविध विद्यापीठांत 1 वर्ष जपानी भाषेचे किंवा संस्कृतीचे अध्ययन करता येणार आहे.
जपान येथील विविध विद्यापीठांत मोंबुशो शिष्यवृत्तीकरीता पाठक मानस (नागोया विद्यापीठ), हिमांशी नथानी (ओसाका विद्यापीठ), झुमदार कौशिक (वाकायामा विद्यापीठ), वनारसे साक्षी (कोक्काईदो विद्यापीठ), काजल भाटिया (शिझुओका विद्यापीठ), पंडित मिहीर (ओसाका विद्यापीठ), जोशी अनुष्का (तोत्तोरी विद्यापीठ), कुलकर्णी कल्याणी (साईतामा विद्यापीठ) या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. टिमविच्या जपानी भाषा विभागातील मोंबुशो शिष्यवृत्तीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 70 टक्क्यांहून अधिक आहे.
ही निवड देशभरातून होत असते. विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, कुलगुरु डॉ. गीताली टिळक, टिमवि ट्रस्टचे सचिव अजित खाडीलकर यांच्यासह विभागाच्या विभागप्रमुख व विभागाचे समन्वयक सुप्रिया फाटक, राधिका कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.