गुडगावच्या धर्तीवर रचना केली जाण्याची शक्यता ः पालिकेतर्फे अभ्यास
पुणे – सारसबाग चौपाटीवर फुड प्लाझा विकसित केला जाणार आहे. त्या सुधारित आरखड्यास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कामाची निविदा प्रक्रिया सुरू केलेली असतानाच आता हा फुड प्लाझा दुमजली उभारला जाण्याची चर्चा आहे.
गुडगाव येथे अशा प्रकारचे दोन मजली फुड प्लाझा उभारण्यात आलेले आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण आणि भवन विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंगळवारी जाणार आहेत.
सुधारित आराखड्यानुसार सारसबागेची सीमाभिंत आणि सणस मैदान सीमा भिंतीदरम्यान खाऊ गल्ली, नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक रचना, सुशोभीकरण, विविध कलाकृती सादर करण्यासाठीचे छोटेखानी मंच करण्याचे नियोजन आहे.
सध्या चौपाटीसमोरील रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर होतो. फुड प्लाझा करताना येथील रस्ता बंद करण्यात येणार आहे. त्यासाठीचा आराखडा अंतिम टप्प्यात असतानाच; आता प्रशासनाने हा प्लाझा दुमजली करता येईल का याची चाचपणी सुरू केली आहे.
या ठिकाणी सध्या 53 स्टॉल असून प्लाझा दुमजली केल्यास आणखी काही स्टॉल वाढणार आहेत. त्यातून वाढीव उत्पन्न मिळाल्यास प्लाझाच्या देखभाल दुरुस्तीसही निधी उपलब्ध होईल का या अनुषंगाने पालिकेकडून चाचपणी केली जात आहे.