यवत – दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्य बजावणारे पोलीस हवालदार संभाजी उर्फ संदीप जगन्नाथ कदम (वय ४३ वर्ष,रा.बारामती,मुळगाव लासुर्णे, ता.इंदापूर) यांचा बारामती भिगवन रस्त्यावर अपघात झाला होता. संदीप (संभाजी) यांना हॉटेल अभिषेक समोरून जात असताना टेम्पोने धडक दिली होती. शुक्रवार (ता.२२) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला त्यानंतर उपचारादरम्यान संभाजी यांचे सोमवारी (ता.२५) निधन झाले.
संदीप (संभाजी) कदम यांच्यावर मुळगाव लासुर्णे ता.इंदापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.संदीप (संभाजी) कदम हे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील यवत पोलीस ठाण्यात मागील तीन वर्षापासून कार्यरत होते.पायी जात असताना पाठीमागून आलेल्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती त्यामध्ये कदम हे गंभीर जखमी झाले होते.त्यानंतर कदम यांना बारामती मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यामधील खासगी रुग्णालयात आणण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे या गावचे रहिवासी असलेले संदीप (संभाजी) कदम यांनी बारामती शहर,जिल्हा ग्रामीण पोलीस दलात,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व लोणी काळभोर पोलीस ठाण्यात यापूर्वी कर्तव्य बजावलेले आहे. मागील तीन वर्षापासून संदीप (संभाजी) कदम हे यवत पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीमध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते.
संदीप (संभाजी) कदम यांच्या निधनाची खबर मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला. संदीप (संभाजी) कदम यांच्या पश्चात आई – वडील,पत्नी तीन बहिणीसह,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.